जळगाव : विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगावमध्ये दाखल झाले आहेत. धुळे, नंदुरबार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी फडणवीस दोन दिवस उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच खडसेंनी फडणवीस आणि महाजनांवर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे आता एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट होते का? हे पाहणं महत्वाचं आहे. तरी, राज्याची सत्ता हातातून गेल्यानंतर भाजप आता स्थानिक निवडणुकांमध्ये आपलं वर्चस्व राखण्याचा प्रयत्न करत आहे.

विधानसभा निवडणुकांनंतर आता राज्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवरून वातावरण तापलं आहे. जळगाव जिल्हा परिषदेवर एकनाथ खडसेंचं वर्चस्व आहे. तसेच जळगावमध्ये एकनाथ खडसे यांची शिवसेनेला साथ मिळण्याची शक्यता असल्याचं काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटिल यांनी सांगितले होते.

आधी गंभीर आरोप आणि 24 तासांत मनोमिलन, असं काहीसं चित्र काल भाजपात पाहायला मिळालं. फडणवीस आणि महाजनांमुळे आपलं तिकीट कापलं, असा गंभीर आरोप एकनाथ खडसेंनी केला होता. त्यानंतर गिरीश महाजनांनीही एकनाथ खडसेंना थेट आव्हान दिलं होतं. याला काही तास उलटत नाहीत तोच जळगाव जिल्हा परिषद निवडणुकीसाठी एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले. फक्त एकत्र नाही तर आपल्यात काहीही बेबनाव नसल्याचं खडसे आणि महाजनांनी ठासून सांगितलं होतं.

खडसे आणि महाजन बैठकीला एकत्र

माझं राजकारण फडणवीस-महाजन संपवत असल्याचा आरोप करणारे एकनाथ खडसे आज महाजनांसोबत बैठकीला दिसून आले. जळगाव जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवडणूक होणार आहे. त्यानिमित्तानं भाजप कार्यालयात आज महाजन आणि खडसे बाजूबाजूला बसले होते. अनेकदा विविध व्यासपीठांवर आपली नाराजी उघडपणे मांडणाऱ्या एकनाथ खडसेंनी कुणाचंही नाव मात्र घेतलं नव्हतं. पण एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यामुळे आपलं तिकीट कापल्याचा थेट आरोप केला होता. स्वत:च्या राजकारणासाठी फडणवीस आणि महाजन यांनी आपल्याला तिकीट मिळू दिलं नाही, असा गौप्यस्फोट खडसेंनी केला होता. आपलं राजकारण संपवण्याचाच हा डाव असल्याचा गंभीर आरोपही खडसेंनी एबीपी माझाशी बोलताना केला होता. त्यावर आपण खडसेंशी बोलून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं होतं.

खडसेंच्या आरोपानंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण

नाथाभाऊंना चुकीची माहिती देण्यात आली आहे. कोअर कमिटीच्या बैठकीत असा कुठलाही विरोध किंवा चर्चा देखील झाली नाही. राज्यात चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता, विनोद तावडे, राज पुरोहित यांना देखील तिकीट मिळाले नाही. कुणीतरी सांगितले म्हणण्यापेक्षा चुकीच्या माहितीच्या आधारे असं बोलणं चुकीचं आहे. याचा सोक्षमोक्ष होणं गरजेचं आहे, असे महाजन म्हणाले होते. चुकीच्या माहितीच्या आधारे असे आरोप करणं योग्य नाही, मी याबाबत खडसे यांच्याशी बोलेन, असेही महाजन म्हणाले. खडसे यांनी व्यवस्थित माहिती घेऊन चर्चा करावी. कुठंतरी मीटिंगमध्ये चर्चा झाली किंवा आम्ही विरोध केला अशा ऐकीव गोष्टीवरून टीका करू नये. केंद्रीय निवड समितीने या सर्व लोकांचा निर्णय केला आहे. त्यामुळे हे आरोप चुकीचे आहेत, असेही ते म्हणाले होते.

संबंधित बातम्या : 

खडसेंकडून चुकीच्या माहितीच्या आधारे आरोप, गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण