सभेहून परतणाऱ्या बसला आग, 42 शिवसैनिक बचावले
एबीपी माझा वेब टीम | 24 Dec 2018 10:54 PM (IST)
पंढरपूर-मिरज रोडवरील नागज फाट्यावर ही घटना घडली. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून बसमधील चालकांसह सर्व शिवसैनिक सुरक्षित आहेत.
पंढरपूर : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पंढरपुरातील सभेहून परतत असताना शिवसैनिकांच्या बसला आग लागल्याची घटना घडली आहे. पंढरपूर-मिरज रोडवरील नागज फाट्यावर ही घटना घडली. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून बसमधील चालकांसह सर्व शिवसैनिक सुरक्षित आहेत. उद्धव ठाकरे यांची पंढरपूर येथे महासभा आयोजित करण्यात आली होती. ज्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून शिवसैनिक पंढरपुरात दाखल झाले होते. त्यासाठी शिवसैनिकांनी एसटी महामंडळाची बस भाड्याने घेतली होती. मात्र सभेहून परतत असताना पंढरपूर-मिरज रोडवरील नागज फाट्यावर बसने अचानक पेट घेतला. गारगोटी आगाराची असणारी बस क्रमांक MH14 BT - 0728 ही पंढरपूरहुन गारगोटीला जात होती. बसमध्ये 42 शिवसैनिक होते.मात्र कोणालाही इजा झाली नसल्याची माहिती मिळत आहे.