मुंबई : दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या माजी मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांच्या विरोधात शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली. आज शिवसेना पक्षप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा 7 वा स्मृतीदिन आहे. यानिमित्त देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी शिवतीर्थावर उपस्थिती लावली. यावेळी, पुन्हा येईन...मी पुन्हा येईन...अशा घोषणा शिवसैनिकांनी फडणवीस यांच्या विरोधात लावल्या.

मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये सध्या बिनसलं आहे. दोन्हीही पक्ष मुख्यमंत्री आमचाच होईल म्हणून अडून बसले आहेत. शिवसेनेने आघाडीतील पक्षांशी जवळीक साधली आहे. तर, भाजप नेते अजूनही सत्ता आमचीच येणार अशी वक्तव्य करत आहे. याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, पंकजा मुंडे हे शिवाजी पार्क या ठिकाणी असलेल्या शिवतीर्थावर अभिवादन करण्यासाठी आले होते. याचदरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली.

दरम्यान, सकाळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांना ट्वीटरवरून आदरांजली वाहिली आहे. 'स्वाभिमान जपण्याचा मूलमंत्र आदरणीय बाळासाहेबांनी आपल्या सर्वांना दिला!' असं म्हणत फडणवीस यांनी व्हिडिओ शेअर केला आहे. यावर 'आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. शिवसेनेला कुणीही शहाणपणा शिकवण्याची गरज नाही' असं उत्तर राऊत यांनी दिलं आहे.

संबंधित बातम्या -

 Balasaheb Thackeray | शिवसेनेला कुणीही शहाणपणा शिकवण्याची गरज नाही, संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना टोला  

 देवेंद्र फडणवीसांकडून शिवसेनेला बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची आठवण