सांगली : शिवप्रतिष्ठानमध्ये कार्यवाहक पदावर राहिलेल्या नितीन चौगुले यांचे काही दिवसांपूर्वी शिवप्रतिष्ठानकडून निलंबन करण्यात आले होते. निलंबित केलेल्या नितीन चौगुले यांचा काही वेळात सांगलीतील डेक्कन हॉलमध्ये शिवभक्तांचा मेळावा पार पडत आहे. या मेळाव्यात नितीन चौगुले नवीन संघटनाची घोषणा करून शिवप्रतिष्ठानला पर्याय उभारणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. याशिवाय नितीन चौगुले आपल्या भाषणात कोणकोणत्या मुद्याचा आधार घेत निलंबित केल्याबद्दल शिवप्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यावर बोलतात हे पाहणे महत्वाचे आहे.


शिवप्रतिष्ठान मधील फूट आता अटळ आहे. शिवप्रतिष्ठान मधून निलंबित केलेले नितीन चौगुले आणि त्यांच्या समर्थक धारकाऱ्यांचा मेळावा सांगलीत पार पडत आहे. यामुळे आता या मेळाव्यातुन चौगुले आणि समर्थक काय भूमिका घेणार याच्याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेते गेल्या 20 वर्षांपासून हिंदुत्ववादी व भिडे गुरुजींची कट्टर समर्थक म्हणून नितीन चौगुले यांना ओळखले जाते. गेल्या काही वर्षांपासून नितीन चौगुले हे शिवप्रतिष्ठानचे कार्यवाहक म्हणून काम करत होते. शिवप्रतिष्ठानमध्ये संभाजी भिडे गुरुजी यांच्या शब्दाबरोबर नितीन चौगुले यांच्या शब्दालाही तितकाचा मान होता. मात्र 5 फेब्रुवारी रोजी शिवप्रतिष्ठानकडून राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून नितीन चौगुले यांना निलंबित करुन काढून टाकण्यात आल्याचे सांगितले.


संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठानमध्ये फूट? कार्यवाहक नितीन चौगुले यांना पदावरुन हटवलं


शिवप्रतिष्ठानमध्ये फूट?
अचानक झालेल्या या कारवाईमुळे शिवप्रतिष्ठानसह राज्यात खळबळ उडाली होती. तर निलंबनाचे कारण यासाठी नितीन चौगुले आणि समर्थक धारकाऱ्यांनी राष्ट्रीय अध्यक्षांच्या घरात ठिय्या मारला होता. आणि वेगळ्या विचाराचा इशारा दिला होता. मात्र, निलंबनाचे कारण अद्याप देण्यात आले नसून या कारवाईच्या पार्श्वभूमीवर नितीन चौगुले आणि समर्थक धारकऱ्यांनी अन्यायी कारवाई असल्याचा आरोप करत राज्यातील धारकाऱ्यांना चलो सांगलीची हाक दिली होती. आज सांगलीच्या डेक्कन हॉल याठिकाणी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात नितीन चौगुले समर्थक हे झालेल्या कारवाईबाबत चर्चा करणार आहेत. शिवाय नितीन चौगुले हे त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत खुलासा करत आपली पुढील भूमिका जाहीर करणार असल्याचे नितीन चौगुले समर्थकांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या मेळाव्याला काही वेळात सुरवात होणार असून या मेळाव्याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले असून शिवप्रतिष्ठान मधील फूट अटळ असल्याचे बोलले जात आहे.