सांगली : संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठानमध्ये फूट पडली आहे. सांगलीत शिवप्रतिष्ठानचे कार्यवाहक नितीन चौगुले यांना पदावरुन हटवण्यात आलं आहे. शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी नितीन चौगुले यांच्यावर कारवाई केल्याची माहिती एका व्हिडीओच्या माध्यामातून दिली आहे. शिवप्रतिष्ठानच्या वतीने नितीन चौगुले यांना पदावरून हटवण्याचं नेमकं कारण अजून स्पष्ट केलेलं नाही.
शिवप्रतिष्ठानचे कार्यवाहक नितीन चौगुले यांच्यावर कारवाई केल्याची माहिती एका व्हिडीओच्या माध्यामातून संघटनेच्या वतीनं देण्यात आली. या व्हिडीओमध्ये सांगण्यात आलं आहे की, "मी शिवप्रतिष्ठानचा राष्ट्रीय अध्यक्ष प्रसारित करित आहे की, शिवप्रतिष्ठानमधून नितीन चौगुले यांना निलंबित केलं आहे, काढून टाकलं आहे. तथापि, त्यांच्याशी कोणीही संबंध ठेवू नये."
यासंदर्भात स्वतः नितीन चौगुले यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली. नितीन चौगुले म्हणाले की, "मला अद्याप कोणतंही अधिकृत कारण समजलेलं नाहीये. मी आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांची भेट घेतली. त्यांना एक निवेदन मी केलंय. जी काही कारण असतील ती मला सांगण्यात यावीत. कारण दोन दिवसांपूर्वी आम्ही एकत्र होतो. दोन दिवसांपूर्वीच शारजिल उस्मानी आणि एल्गार परिषद यांच्याविरोधात सांगलीत आंदोलन केलं होतं. त्यामुळे मी अध्यक्षांना निवेदन दिलं आहे. मला उत्तर मिळेल. अद्याप याप्रकरणी माझी गुरुजींशी काहीच बोलणं झालेलं नाही. तसेच गुरुजींचा मला कोणताही निरोप मिळालेला नाही. अध्यक्षांकडून माझ्या निलंबनाती घोषणा झाली, त्यामुळे मी त्यांनाच निवेदन दिलेलं आहे." पुढे बोलताना ते म्हणाले की, "सहकाऱ्यांकडून कारणं कळण्यापेक्षा मला अधिकाऱ्यांकडून कारणं कळतील."
पाहा व्हिडीओ : संभाजीराव भिडे यांच्या शिवप्रतिष्ठानमध्ये फूट; कार्यवाहक नितीन चौगुले यांना पदावरुन हटवलं
"शिवप्रतिष्ठानच्या चाकोरीबाहेर मी कोणतीच घोषणा केलेली नाही, तसेच कोणताच उपक्रमही राबवलेला नाही.", असं नितीन चौगुले यांनी बोलताना सांगितलं. तसेच आता पुढे कोणती भूमिका घेणार यासंदर्भात विचारलं असता ते म्हणाले की, "अद्याप मला कोणतंही अधिकृत कारण कळालेलं नाही. आता मी अध्यक्षांना निवेदन दिलेलं आहे. त्यांच्याकडून उत्तर मिळाल्यानंतर पुढील भूमिका ठरवणार."
नितीन चौगुले यांनी बोलताना सांगितलं की, "छत्रपती श्री शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, भगवा ध्वज आणि भारत माता यांच्यासाठी संपूर्ण आयुष्य द्यायचं, अशी शपथ मी जगदिश्वराचरणी घेतली आहे. ती पूर्ण करिन"