हिंगोली: शिवजयंतीसाठी शिवरायांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यासाठी करार केल्यानंतर एका खासगी कंपनीने आयोजक समितीची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. हेलिकॉप्टर कंपनीला दोन लाख 40 हजार भाडे ठरले असताना अचानक 12 लाखांची मागणी केल्याचा आरोप समितीने केला आहे.


राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह आहे. कोरोनानंतर पहिल्यांदाच यावर्षी नियम शिथिल केल्यामुळे जयंती जल्लोषात साजरी करण्यासाठी सर्व शिवप्रेमी तयार आहेत. हिंगोली शिवजयंती समितीच्यावतीने सुद्धा शिवजयंती जल्लोषात साजरी करण्यासाठी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करण्यात येणार होती. त्यासाठी शिवजयंती समितीच्या वतीने भाडेतत्त्वावर एका खासगी कंपनीकडून हेलिकॉप्टर आणून हिंगोली जिल्ह्यातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्याचे ठरवले.


पुण्याच्या फ्लाय ईझी नावाच्या हेलिकॉप्टर पुरवठा करणाऱ्या कंपनीसोबत शिवजयंती समितीने हेलिकॉप्टर भाड्याने घेण्याचं ठरवलं. या हेलिकॉप्टरचे एकूण भाडे दोन लाख 40 हजार रुपये इतके ठरवण्यात आले. यासाठी शिवजयंती समितीच्या वतीने ॲडव्हान्स रक्कम संबंधित फ्लाय ईजी कंपनीच्या संचालकाला देण्यात आली.


त्यानंतर आज कंपनीच्या संचालकाने हेलिकॉप्टर रद्द झाल्याचे सांगित. दुसरे हेलिकॉप्टर उपलब्ध करायचे असेल तर बारा लाख रुपये लागतील आणि ते हेलिकॉप्टर पुष्पवृष्टीसाठी वापरायचं असेल तर आपल्याला आणखी दोन लाख रुपये द्या अशी संबंधित कंपनीच्या संचालकाने शिवजयंती महोत्सव समितीच्या अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांकडे मागणी केली.


या प्रकारामुळे शिवजयंती महोत्सव समितीची फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर समितीचे अध्यक्षांनी या प्रकरणी हिंगोली पोलिसात तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी यामध्ये संबंधित कंपनीचे संचालक आणि अन्य एका कर्मचाऱ्याला तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत. पुढील तपास हिंगोली पोलिस करत आहेत. 


संबंधित बातम्या: