मुंबई : वेणीफणी कर, जेवण शिक, किमान अभ्यासाला बस असं आईनं मुलीला सांगण्याचे दिवस केव्हाच मागे पडले. आताच्या काळात असं सांगितलं जात असेलही, पण त्यासोबतच आई आता आपल्या मुलीला तितक्याच धाडसानं आणि आत्मविश्वासानं या विश्वाच्या खुल्या आसमंतात स्वैर वावरण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. डोंगराच्या वळणवाटांवर निघालेली 'ती' असो किंवा मग स्पोर्ट्स बाईक घेऊन पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या एखाद्या क्षेत्रात कारकिर्द साकारणारी 'ती' असो. आधुनिक काळातील 'ती' सर्वार्थानं परिपूर्ण आणि कमालीची जिद्दी आहे.


जिद्द आणि आत्मविश्वासाच्या याच बळावर महाराष्ट्रातील काही मुली 2020 मधील ऑक्टोबर महिन्यापासून एका अनोख्या मोहिमेत सहभागी झाल्या आहेत. माऊंटन क्लाइंबिंग, या खेळाला ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेत स्थान मिळालं आणि या खेळात भारताचंही प्रतिनिधीत्व दिसून यावं यासाठी शिवदुर्ग मित्र, लोणावळा आणि ट्रेकिंग अँड अॅडव्हेंचर क्लब यांच्यातर्फे एक पाऊल उचललं गेलं.


गणेश गीध आणि त्याच्यासोबत असणाऱ्या काही खास मंडळींनी डोंगर, गडकिल्ले सर करण्यासोबत आणि इथं बचावकार्यांमध्ये हिरीरिनं पुढाकार घेण्यासोबतच सुरुवात केली या अनोख्या मोहीमेची. ही मोहिम होती अॅथलिट घडवण्याची.


काही महिन्यांसाठी राज्याच्या काही भागांतून डोंगर आणि कातळांवर उभी चढाई करण्यासाठी म्हणून इच्छुक असणाऱ्या आणि मनाशी ध्येय्य बाळगणाऱ्या मुलींना एकत्र आणत गणेश गीध आणि त्याच्या काही साथीदारांनी स्वप्नपूर्तीच्या दिशेनं वाटचाल केली. त्यांचा हा प्रवास अद्यापही सुरुच आहे. उंच,उंच कातळाच्या सुळक्यांना पाहतानाच मनात भीती उभी राहते अशा ठिकाणी या मुली एखाद्या सराईताप्रमाणं जणू या कातळाच्या अंगाखांद्यावर आपण खेळत आहोत अशाच अंदाजात त्यांवर चढाई करतात. सुळक्यांच्या टोकावर पोहोचल्यावर त्यांच्या मनात दाटलेल्या भावना आणि स्वत:वरच असणाऱ्या विश्वासात पडलेली भर खूप काही सांगून जाते.


गेल्या काही महिन्यांपासून या मुली पुण्यात एके ठिकाणी वास्तव्यास आहेत. इथं त्यांच्या राहण्यापासून संपूर्ण पोषक आहाराच्या सवयी अर्थात डाएटपर्यंतची सर्व काळजी घेतली जाते. कातळकड्यांवर चढाई करणं ही काही सोपी बाब नाही. आता तो कातळच म्हटल्यावर कुठे ना कुठे ठेच ही लागायचीच. दुखापतही व्हायचीच. मुळात त्याशिवाय कसली चढाई आणि कसली शिकवण.



कुटुंबापासून दूर असणाऱ्या या मुलींना प्रात्यक्षिक चढाईसाठी विविध ठिकाणांवर नेत त्यांच्या या प्रशिक्षणासाठी परदेशातून सामग्रीही मागवण्यात आली. सक्तीच्या आहाराच्या सवयींच्या बळावर मुलींना शारीरिक बळकटी देण्यावर भर देण्यात आला. कणखर देशा म्हणत या महाराष्ट्राच्या लेकीही यानिमित्तानं अधिक कणखर आणि अधिक राकट होत गेल्या.


एकमेकींना मदत करण्यापासून दुखापत झाल्यानंतर एकमेकींची काळजी घेण्यापर्यंतचं आपलेपणाचं नातंही या मुलींमध्ये फुललं. फक्त डोंगर, काळांवर चढाई करण्याचं प्रशिक्षण घेण्यापुरताच ही मोहिम, हा उपक्रम मर्यादित राहिला नाही तर यामध्ये एक व्यक्ती म्हणून कितीही आव्हानं आली तरीही त्यावर मात करुन संकटांवर टिच्चून जीवनाचा हा कडा चढतच राहायचा ही शिकवण या मुलींना मिळाली आणि त्या माध्यमातून प्रशिक्षकांनाही सह्याद्रीच्या या लेकींना आणखी कणखर केल्याचं समाधान मिळालं.


गणेश आणि त्याच्या साथीदारांनी पाहिलेलं एक स्वप्न आता साकार होण्याच्या मार्गावर आहे. पुढं या मुली आपआपल्या मार्गांवर जातील. पण, मोठ्या बदलासह आणि व्यापक दृष्टीकोनासह त्या जीवनाकडे आणि जीवनातील आव्हानांकडे पाहतील. येत्या काळात शासनाच्या मदतीनं आणि सर्व अडथळे पार करत जिद्दीच्याच बळावर थेट ऑलिम्पिकपर्यंतही यांत्याची कोणी मजल मारेल. एका चौकटीबाहेरच्या खेळात देशाचं प्रतिनिधीत्त्वं करेल यात शंका नाही.