शिर्डी : शिर्डी साई मंदिरात दरवर्षी रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मात्र सध्या कोरोनाच सावट असल्याने सर्व मंदिरे भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात आली आहेत. शिर्डी साई मंदिरही बंद असल्याने  रामनवमी उत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजके अधिकारी, पुजारी आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीत आज रामनवमी उत्सवाला सुरूवात झाली. शिर्डी साई मंदिरात तीन दिवस रामनवमी उत्सव साजरा केला जातो. आज पहाटच्या काकड आरतीनंतर साईबाबांचा फोटो , विणा आणि पोथीची मिरवणूक काढण्यात आली. साई मंदिरातुन गुरूस्थान आणि त्यानंतर द्वारकामाई मंदिरापर्यंत मिरवणूक काढल्यानंतर साईसतचरित्राचा पहिला अध्याय वाचुन उत्सवाला सुरूवात झाली.


रामनवमी उत्सवासाठी देशभरातुन येणा-या पायी पालख्यांना अगोदरच मनाई करण्यात आली होती तर गावचा यात्रा उत्सवही अगोदरच रद्द करण्यात आला होता. त्यानंतर साई मंदिरात फक्त धार्मिक विधी पार पडत असून रामनवमीला मंदिरातुन निघणारी साईपालखी देखील रद्द करण्यात आली आहे.


 महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत हजाराने वाढ होत असल्याचं चित्र आहे.  काल 58  हजार 412 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे काल 52 हजार 412 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 39 लाख 59 हजार 240 रुग्ण बरे होऊन  घरी परतले आहेत. राज्यात एकूण 6 लाख 76 हजार 520 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.04 टक्के  झाले आहे. राज्यात काल एकूण 351 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. सध्या मृत्यूदर 1.5६ टक्के आहे. आतापर्यंत एकूण 60 हजार 824 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल नोंद झालेल्या 351 मृत्यूंपैकी 220 मृत्यू मागील 48 तासातील आहेत. तर 85 मृत्यू मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 46 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीतील आहेत.