मुंबई : राज्यात कोरोना रुग्ण संख्या वाढत असताना रेमडेसिवीरची मागणी प्रचंड आहे. ती मिळत नसल्यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे. याच वेळी राज्यात ब्रूक फार्मा कंपनीने रेमडेसिवीर औषधांचा साठा केला यावरून मुंबई पोलिसांनी या कंपनीच्या प्रतिनिधीला चौकशीसाठी बोलवलं असताना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर विलेपार्ले पोलीस स्थानकात पोहोचले होते. 


यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षात आरोप प्रत्यारोप झाले. निर्यात करणाऱ्या कंपनीला महाराष्ट्रात रेमडेसिवीर देण्याची परवानगी नसताना ती औषधं मुंबईत कशासाठी आणली? भाजपला कशी परवानगी मिळाली? त्यांनी हा साठा कसा खरेदी केला? असे प्रश्न सत्ताधाऱ्यांनी विचारले. त्यानंतर ही औषधं भाजपसाठी नाहीतर राज्य सरकारला देणार आहोत, अशी भूमिका भाजपने मांडली. 


दोन दिवस यावरून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत, पण राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार मात्र या प्रकरणावर नाराज आहेत. राज्यात कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. लोकांमध्ये अस्वस्थता आहे. नागरिकांना बेड मिळणं, औषध मिळणं हे महत्वाचे आहे. औषधवरील राजकारण, आरोप प्रत्यारोप हे यावेळी योग्य नाही, अशी भूमिका शरद पवार यांची आहे. 


राज्यातील बेडस, ऑक्सिजन, रेमडेसिवीरबाबत शरद पवार यांनी माहिती घेतली आहे. आपल्या मंत्र्यांकडून आढावा घेतला असून कोरोनाबाबत शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील म्हंटल आहे. 


तसेच अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी यासंदर्भात बोलताना या काळात सगळ्यांनी एकत्र येऊन परिस्थिती हाताळली पाहिजे. रेमडेसिवीरवरुन राजकारण आम्ही सुरु केलं नाही, तर ते भाजपनं सुरु केलं. सत्यपरिस्थिती जनतेसमोर ठेवत असून एखादी मदत होऊ शकते ही भूमिका घेतली पाहिजे, पण भाजप राजकारण करत आहे, असं म्हटलं आहे. 


पण नागरिकांना सत्ताधारी आणि विरोधकांमधील वादात रस नाही. लोकांना सुविधा मिळणं महत्वाचं आहे. त्यामुळे हे वाद झाले नाही पाहिजेत, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली आहे. त्यामुळे एकूणच राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत. पण राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र या वादावर नाराजी व्यक्त केली आहे.


शरद पवार यांच्या या भूमिकेनंतर रेमडेसिवीर प्रकरणी राज्य सरकार विरुद्ध विरोधी पक्ष हा वाद थांबणार का हा प्रश्न आहे.  


महत्त्वाच्या इतर बातम्या :