मुंबई : देशासह राज्यात कोरोनाबाधितांवर उपचारासाठी लागणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रेमडेसिवीरवरुन चांगलीच जुंपल्याचं दिसत आहे. रेमडेसिवीरचा साठा केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाची चौकशी केली होती. यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला होता. त्यापाठोपाठ अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी फडणवीसांचे आरोप फेटाळून लावत प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलताना नवाब मलिक म्हणाले की, "देशात ऑक्सिजनचा तुटवड्यासोबतच रेमडेसिवीरचाही तुटवडा निर्माण झालेला आहे. असं असताना काही पक्षांना राजकारणाशिवाय काही करता येत नाही, ही सत्य परिस्थिती आहे. महाराष्ट्रात भाजपकडून कुठेतरी सरकार कामचं करत नाही, रेमडेसिवीर उपलब्ध करुन देत नाही, असा प्रचार केला जात आहे. देशातील सात रेमडेसिवीर कंपन्यांना केंद्राने परवानगी दिलेली आहे. तर 17 कंपन्या अशा आहेत, ज्या निर्यातीसाठी स्वतः औषधाची निर्मिती करु शकतात आणि दोन कंपन्यांच्या माध्यमातून जगभरात पुरवठा करु शकतात. देशात जेव्हापासून रुग्णांचे आकडे वाढण्यास सुरुवात झाली, त्यानंतर रेमडेसिवीर भेटत नसल्याचं चित्र निर्माण झालं होतं. त्याचवेळी सुरतच्या भाजपा कार्यालयात रेमडेसिवीर वाटलं जात होतं. यावर आम्ही प्रश्न उपस्थित केल्यानंतर गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला की, याबाबत आम्हाला काही माहिती नाही. आम्ही परवानगी दिलेली नाही."
"भाजपचे काही नेते रेमडेसिवीर इंजेक्शनचे 50 हजार वाईल्स महाराष्ट्र सरकारला आणून देऊ, असा दावा करु लागले. पण सत्य परिस्थिती वेगळी आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच रेमडेसिवीरचा साठा त्यांच्या गोडाउनमध्ये उपलब्ध झाला होता. ते चालवणारे एक भाजपचे नेते आहेत. जळगाव-अमळनेर येथून अपक्ष निवडणून आले आणि 2019च्या निवडणुकीत भाजपाकडून पराभूत झाले होते. नंदूरबारमधील हिरा एक्झक्युटिव्ह हजारो रेमडेसिवीरचा साठा करुन ठेवला होता. त्यांनी आठ तारखेला लोकांना वाटप केलं. वीकेंड लॉकडाऊननंतर 12 एप्रिलला पुन्हा वाटप केलं. ब्रुक फार्माचे 20 हजार पेक्षा जास्त रेमडेसिवीर वाईल्स आणून ठेवली होती. हे करण्यासाठी त्यांच्या स्टाफकडे एफडीएचा कोणता परवाना होता का? बेकायदेशीरपणे रेमडेसिवीर आणतात आणि वाटतात. तिच व्यक्ती प्रविण दरेकरांना घेऊन राजेंद्र शिंगणे यांना भेटले होते. याप्रकरणी आता एफडीएने नंदूरबार जिल्ह्याधिकाऱ्यांना चौकशी करण्याची सूचना केली आहे.", असं नवाब मलिक म्हणाले.
"राज्यात तुटवडा असताना आणि रेमडेसिवीर देण्यात अडवणूक होत असल्याचं मी म्हटलं होतं. ब्रुक फार्माला महाराष्ट्र एफडीएने पत्र दिलं होतं. त्यावर दमणच्या एफडीएने रेमडेसिवीर देता येणार नाही, सांगितलं. म्हणून मी मुद्दा उपस्थित केला होता की, केंद्राकडून अडवणूक होतेय. मग केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी यासंदर्भात चर्चा केली.", असं नवाब मलिक म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, "आता ब्रुक फार्माच्या मालकाला वाचवण्यासाठी माजी मुख्यमंत्री वकीलपत्र घेत आहेत. माझ्या जावयाचा प्रश्नच नाही. कायदा सगळ्यांसाठी सारखाच आहे. जावयाच्या सुटकेसाठी मी बोलत नाही. फडणवीस म्हणाले की, जावयाला अटक झाल्यामुळे नवाब मलिक केंद्राच्या विरोधात बोलत आहेत. तर, कालपासून काहीजण माझ्याकडे बोट दाखवत आहे. क्रिस्टल कंपनीच्या मालकाला सांगतोय की, किती कारभार पारदर्शी चालतो लवकर दाखवा. माझा राजीनामा मागत आहेत. राज्यपालांकडे जात आहेत, मी त्यांना विचारतोय की देशात कुठला मोदी कायदा आलाय का? त्या कायद्याच्या अंमलबजावणीचे अधिकार राज्यपालांना दिले आहेत का? मग त्याची माहिती आम्हालाही द्या. काळा बाजार आणि साठा करणाऱ्यांना भाजपा का वाचवत आहे?", असा इशाराही नवाब मलिकांनी दिला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :