शिर्डी : दोन आठवड्यात शिर्डीच्या साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ नेमण्याचे आदेश औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिल्यानंतर आता नवीन विश्वस्त मंडळ नेमण्याच्या हालचाली वाढल्या असून अध्यक्षपदावरून सुरू असलेला तिन्ही सत्ताधारी पक्षातील वाद संपला असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. साईबाबा संस्थानचे अध्यक्षपद काँग्रेसला मिळणार असल्याची चर्चा सुरु होताच आता अध्यक्ष पदासाठी विविध नावांची चर्चा समाज माध्यमातून सुरू झाली आहे.  कॉंग्रेसकडून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे सत्यजित तांबे, माजी विश्वस्त डॉ.एकनाथ गोंदकर यासह साईबाबा संस्थांनचे सर्वाधिक अध्यक्षपदी राहिलेलं माजी अध्यक्ष  जयंत ससाणे यांचे पुत्र करण ससाणे यांचे ही नाव पुढे आले आहे. 


गेल्या अनेक दिवसापासून साईबाबा विश्वस्त मंडळ येणार याची चर्चा सुरू होती. आता मात्र न्यायालयाने 2 आठवड्यात  नियमावली नुसार विश्वस्त मंडळ नेमण्याचे आदेश दिल्यानंतर महाविकास आघाडीतील सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते विश्वस्त होण्यासाठी लॉबिंग करताना दिसत आहेत. विश्वस्त मंडळातील 17 जागांसाठी ही निवड होणार असून आता विश्वस्त मंडळात आपली वर्णी लागावी यासाठीराजकीय नेत्यांच्या सोबतच साईबाबांना सुद्धा साकडे घालण्यास सुरवात झाली आहे.


आगामी काही दिवसात विश्वस्त मंडळाची घोषणा होईलही मात्र विश्वस्त मंडळ निवडताना सरकारला नियमावली सुद्धा लक्षात घ्यावी लागणार आहे. विश्वस्त पदी येणाऱ्या व्यक्तीवर कोणतेही गुन्हे दाखल नसावेत व तो साईबाबा भक्त मंडळाचा आजीवन सदस्य असणे नियमावली नुसार गरजेचे आहे तर या व्यतिरिक्त अजून ही नियम आहेत. जर सरकारने नियमावली विरोधात व्यक्तींची निवड केली तर नवीन विश्वस्त मंडळ पुन्हा न्यायालयीन प्रक्रियेत अडकले तर नवल वाटायला नको.


येत्या 22 जूनपर्यंत विश्वस्त मंडळ सरकारला नेमावे लागणार आहे. या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष कोण असणार यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरु असल्याचं पहायला मिळतंय. अध्यक्षपदी दोन्ही पक्षाकडून दावा करण्यात आला आहे. नगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सहा आमदार असल्यामुळे या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्ष पदावर राष्ट्रवादीने दावा केला आहे. मुंबईतील सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्षपद हे शिवसेनेकडे गेल्याने शिर्डीसाठी आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरु आहे.