अकोला : यावर्षीही कोरोनामुळे पंढरपूरची पायी वारी होणार नसल्याचं राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे. त्याऐवजी मानाच्या पालख्यांना बसने वाखरीपर्यंत पादुका नेण्याचं नियोजन सरकारनं केलं आहे. वाखरीवरून प्रतिकात्मक स्वरूपात पालख्या पायी पंढरपूरला जाणार आहेत. मात्र, सरकारच्या या निर्णयाला राज्यातील वारकऱ्यांच्या नऊ संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. या संघटनांनी सरकारला या निर्णयावर पुनर्विचार करायला 24 जूनपर्यंतची मुदत दिली आहे.
सरकारने ज्ञानोबा-तुकाराम महाराजांच्या पालख्यांना 50 लोकांसह पायी दिंडीची परवानगी दिल्यास आंदोलनावर फेरविचार करणार असल्याचे या संघटनांनी स्पष्ट केले आहे. यानंतर सरकारनं सकारात्मक ठोस निर्णय न घेतल्यास या संघटना 3 जुलैला आळंदी ते पंढरपूर अशी पायी वारी काढणार आहेत. या नऊ संघटनांचे प्रत्येकी दहाजण जत्थ्याने सहभागी होणार असल्याचे या संघटनांनी स्पष्ट केलं आहे. या निर्णयामुळे वारकरी संघटनांनी 'माझी वारी, माझी जबाबदारी' हा नारा दिला आहे. या वारीत वारकरी स्वत:हून कोरोना नियमांचं पालन करणार असल्याचे या संघटनांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे सरकारकडून एकीकडे हा प्रश्न निकाली निघाल्याची चर्चा आहे. मात्र, या वारकरी संघटनांच्या या नव्या पवित्र्याने सरकार-वारकरी संघर्ष उभा राहण्याची नाकारता येत नाही.
काय आहे या संघटनांची मागणी?
पंढरपूरची आषाढी वारी हा महाराष्ट्राचा प्राचीन सांस्कृतिक ठेवा आणि परंपरा आहे. मात्र, मागच्या वर्षापासून कोरोनामुळे या वार्षिक आनंद सोहळ्यावर विरजण पडलं आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीही पंढरपूरची आषाढी वारी ही प्रतिकात्मक स्वरूपातच होणार आहे. सरकार आणि काही वारकरी संघटनांमध्ये नुकतीच यासंदर्भात एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत यावर्षीही वारी प्रतिकात्मक स्वरूपात पार पाडण्याचं ठरवलं गेलं. यानंतर या निर्णयानुसार मानाच्या पालख्या आणि पादुका बसने वाखरीपर्यंत नेण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. यानंतर वाखरीवरून प्रतिकात्मक स्वरूपात पालख्या पायी पंढरपूरला जाणार आहेत. मात्र, आता या निर्णयाविरोधात नऊ वारकरी संघटना उभ्या राहिल्या आहेत. या नऊ वारकरी संघटनांनी एकत्र येऊन घेतला ठोस निर्णय घेत पायदळ दिंडी सोहळ्याचे आयोजन केले आहे. सरकारने विशिष्ट संख्येत पायी दिंडी सोहळ्याला.
मान्यता देण्याची या संघटनांची मागणी आहे. यासंदर्भातील निर्णय 24 जूनपर्यंत घेण्याचा अलेटीमेटम या संघटनांनी सरकारला दिला आहे. हा निर्णय घेतला गेला नाही तर या नऊ संघटना, त्यांतील महाराज आणि वारकरी हे दहाच्या जत्थ्याने पंढरपूरकडे प्रस्थान करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. 2 जुलैच्या ज्ञानेश्वर माऊली दिंडी प्रस्थान सोहळ्यानंतर 3 जूलैला हे वारकरी आळंदीवरून पंढरपूरकडे प्रस्थान करण्याचा इशारा या संघटनांनी सरकारला दिला आहे.
वारकऱ्यांचा नारा... माझी वारी, माझी जबाबदारी :
'माझी वारी, माझी जबाबदारी' या संकल्पनेतून या वारकरी संघटना एकत्र आल्या आहेत. सरकारला 'ज्ञानोबा-तुकोबा'चा पालखी सोहळा पायी केला जावा, असा आग्रह या संघटनांनी केला होता. मात्र, कोरोना परिस्थितीमुळे वारकरी संघटनांच्या या मागणीकडे सरकारने दुर्लक्ष केलं आहे. सरकार पायी वारीविषयी गंभीर नसल्याचा आरोप करीत या नऊ वारकरी संघटनांनी एकत्र येत महाक्षेत्र आळंदी ते महाक्षेत्र पंढरपूर अशी पायदळ वारी करीत सरकारचा निषेध व्यक्त करण्याचे ठरविले आहे. 100 वारकरी आणि भाविकांच्या उपस्थितीत या दिंडी सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे. दिंडीचे प्रस्थान 3 जुलैला आळंदीतील इंद्रायणी तीरावरून अगदी साध्या पद्धतीने करण्यात येणार असल्याची माहिती विश्व वारकरी युवा सेनेचे संस्थापक अध्यक्ष हभप गणेश महाराज शेटे यांनी 'एबीपी माझा'ला दिली आहे.
संघटनांनी केले स्वत:च नियमांचे नियोजन
या वारीतील एका जत्थ्यात दहा वारकऱ्यांचा समावेश असणार आहे. या वारीत कोरोनाविषयक सर्व नियम अगदी काटेकोरपणे पाळणार असल्याचं या संघटनांनी स्पष्ट केलं आहे. या दिंडी सोहळ्यासाठी नियम आणि अटी पुढील प्रमाणे असणार आहेत.
1) दिंडी सोहळ्यामध्ये पत्रिकेमध्ये दिलेल्या वारकरी संघटनेमधील पदाधिकारी सहभागी राहतील, असा निर्णय या वारकरी संघटनांनी घेतला आहे.
2) वारकऱ्यांच्या जवळ कोरोना निगेटिव रिपोर्ट असावा. सहभागी वारकरी व्यक्तीची वयोमर्यादा साठच्या आत असावी. मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग आणि इतर कोरोनासंबंधित सर्व नियम पाळावे लागतील.
3) दिंडीमध्ये यायला वारकरी संघटनेच्या वतीने कुठल्याही प्रकारची जबरदस्ती केली जाणार नाही. स्वत:च्या मर्जीने आणि स्वतः च्या जबाबदारीवर 'माझी वारी, माझी जबाबदारी' या नियमाने सहभागी व्हावे लागणार.
4) पालखीसोबत कुठल्याही संतांच्या पादुका राहणार नाहीत पण अधिष्ठान म्हणून ग्रंथराज ज्ञानेश्वरी व पंचमवेद गाथा या पवित्र ग्रंथांच्या साक्षीने दिंडी सोहळ्यातील सर्व नियमावली पार पडेल.
5) वाखरी येथे जर पोलिसांनी अडवलं तर पोर्णिमेपर्यंत तिथेच भजन सत्याग्रह आंदोलन करण्याचा निर्धार आहे.
6) पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाचा रीतसर पास नसल्यामुळे आपण कळसाचे दर्शन घेऊन समाधान व्यक्त करावं लागेल.
7) पायी दिंडी सोहळ्यामध्ये येणाऱ्या वारकऱ्यांच्या जवळून कुठल्याही प्रकारचा आर्थिक निधी स्वीकारला जाणार नाही
8) दिंडीतील वारकर्यांनी गावातील कुठल्याही वारकऱ्यांच्या संपर्कात येऊ नये.
9) संपूर्ण वारी ही बायोबबल पद्धतीने पार पडणार आहे. बायोबबल पद्धत कशाला म्हणतात हे दिंडी सोहळ्यात येणाऱ्या वारकऱ्यांना समजून सांगितले जाईल.
10) दिंडीतील प्रत्येक वारकऱ्यांमध्ये किमान दोन फूट अंतर राहील.
यांचा आहे या आंदोलन वारीला पाठिंबा :
विश्व वारकरी सेनेचे हभप अरुण महाराज बुरघाटे, हभप गणेश महाराज शेटे, अखिल वारकरी भाविक मंडळाचे हभप सुधाकर महाराज इंगळे, राष्ट्रीय भागवत धर्म परिषदेचे हभप चिंतामणी महाराज परभणीकर, हभप योगेश महाराज सातारकर, नांदेडच्या पायी दिंडी पालखी सोहळा इतिहास परंपरा संशोधक संस्थेचे हभप सदाशिव महाराज पवळे, वारकरी सेवा फाउंडेशनचे हभप पांडुरंग महाराज शितोळे, अखिल विश्व वारकरी परिषदेचे हभप नितीन महाराज सातपुते, वारकरी युवक संघाचे हभप श्री संतोष महाराज काळे, हिंदू रक्षक धर्म परिषदेचे हभप दत्ता महाराज गांगरे, हभप महादेव पाटील गायकवाड, राष्ट्रीय भागवत धर्म रक्षा परिषदेचे हभप योगेश महाराज शिंदे यांचा या आंदोलनाला पाठींबा आहे.
वारकरी संघटनांच्या या पवित्र्यानंतर सरकार यातून कसा मार्ग काढतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.