शिर्डी : 'दृश्यम' चित्रपटात पोलिसांना चकवा देणारा अजय देवगण सगळ्यांनाच भावला होता. असाच काहीसा फिल्मी ड्रामा संगमनेरच्या एका तरुणानं करण्याचा प्रयत्न केला. मात्र रील लाईफ आणि रिअल लाईफमध्ये जमिन-आसमानाचा फरक असतो, याची जाणीव नसल्याने त्या तरुणाला आता तुरुंगाची हवा खावी लागत आहे.


संगमनेर पोलिसांनी अटक केलेल्या हौशीराम खेमनरला आता आपल्या कृत्याचा पश्चात्ताप होत आहे. 20 लाखांचं कर्ज फेडण्यासाठी या पठ्ठ्यानं स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचला. मात्र हौशीरामनं सुरु केलेल्या या ड्राम्याचा दी एन्ड संगमनेर पोलिसांनी केला आहे.

4 ऑक्टोबरला हौशीरामच्या मोबाईलवरुन नातेवाईकांच्या मोबाईलवर मेसेज फिरु लागले. ते मेसेज वाचून नातेवाईकांच्या पायाखालची जमीनच सरकली. हौशीरामचं अपहरण झाल्याचं समजताच नातेवाईकांनी पोलिसांत धाव घेतली.

पोलिसांनी वेगानं तपासाची चक्र फिरवली, मात्र अपहरणकर्त्यांनी खंडणीची रक्कम अर्ध्यानं कमी केल्यामुळे पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. मोबाईल फोनवरच्या लोकेशेनमुळे हौशीराम तळेगाव परिसरातच असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

नातेवाईकांकडून खंडणी उकळून कर्जमुक्त होण्याचा हौशीरामचा डाव होता, मात्र तो त्याच्यावरच उलटला. गुन्हेगार कितीही चलाख असला तरी तो पोलिसांच्या जाळ्यात अडकतोच, हे पोलिसांनी पुन्हा सिद्ध केलं.