शिर्डी : संगमनेर तालक्यातीलु श्री क्षेत्र अकलापूर दत्त मंदिरातील दानपेटी दिवसाढवळ्या फोडून त्यामधील रक्कम चोरट्यांनी लंपास केली. चोरीचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दोन चोरट्यांनी मोठ्या शिताफीने दानपेटी फोडत रोख रकमेवर डल्ला मारला. मंगळवारी (7 नोव्हेंबर) दुपारी अडीचच्या दरम्यान ही घटना घडली.

मात्र चोरीचा प्रकार मंदिर प्रशासनाच्या उशिरा लक्षात आला. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं. त्यामधून चोरीचा प्रकार समोर आला.

अकलापूर याठिकाणी श्रीदत्त महारांजाचे भव्य दिव्य असे मोठे मंदिर आहे. जागृत देवस्थान असल्याने हजारो भाविक दत्त महाराजांच्या दर्शनासाठी इथे येतात. हे मंदिर गावापासून दूर आहे. मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास परिसरात कोणी नसल्याचा फायदा घेत, अज्ञातांनी मंदिरातील दानपेटी फोडली.

ही बाब काही नागरिकांच्या लक्षात त्यांनी ही माहिती देवस्थानच्या लोकांना दिली. त्यांनी हे प्रकरणा घारगाव पोलिसांपर्यंत पोहोचवलं. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांना जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दानपेटीतील किती पैसे चोरट्यांनी चोरले आहेत, हे मात्र समजू शकलेलं नाही.

यापूर्वी चोरट्यांनी दत्त मंदिरावरील सोन्याचा मुलामा असणारा कळस कापून पोबारा केला होता. त्या घटनेचा दोन वर्षानंतरही तपास लागलेला नाही. त्यातच आता पुन्हा दिवसाढवळ्या दानपेटी फोडल्याने, एकप्रकारे चोरट्यांनी घारगाव पोलिसांना चॅलेंजच दिलं आहे. त्यामुळे दानपेटी फोडणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या पोलिसांनी लवकरात लवकर आवळाव्यात, अशी मागणी दत्त देवस्थान, ग्रामस्थ आणि भाविक करत आहेत.