श्रीरामपूर (अहमदनगर) : श्रीरामपूरमधील एका शौचालयाचं बांधकाम सर्वांचं लक्ष वेधून घेणारं आहे. शौचालय असलं, तरी त्याचं बांधकाम मात्र भन्नाट वाटतं. कारण यात चक्क बॉटल्सचा वापर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अवघ्या दहा हजार रुपयात हे शौचालय बांधून झालं.
आकाश नलावडे, प्रवीण निकम आणि महेश गावडे हे तीन अभियांत्रिकीचा डिप्लोमा पूर्ण केलेले युवक. अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूरचे तिघेही रहिवासी... नोकरी मिळेना म्हणून तिघांनी कंत्राटदाराची कामं सुरु केली. पण छोटी छोटी कामं करताना त्यांना हा भन्नाट प्रयोग सुचला.
पाण्याच्या रिकाम्या झालेल्या बाटल्यांचा बांधकामात वापर करुन, कमी खर्चात शौचालयाचं एक मॉडेल तयार केलं आहे. साधारणपणे शौचालय बांधताना 16 ते 18 हजार रुपये खर्च येत असतो, मात्र या बांधकामात बाटल्यांचा वापर केल्यामुळे अवघ्या दहा हजार रुपयात शौचालय तयार होत असल्याची माहिती प्रवीण निकम यांनी दिली.
'तीन बाय चार' शौचालयाचं हे मॉडेल बनवताना एक हजार रिकाम्या बाटल्यांचा वापर करण्यात आला. या रिकाम्या बाटल्यांमध्ये माती भरुन हे शौचालय बनवण्यात आलं आहे. भार पेलण्यास मजबूत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. या बाटल्यांचं झाकण निघू नये, यासाठी सिमेंटने ती झाकणबंद केली आहेत.
हे शौचालय नेहमीच्या शौचालयापेक्षा जास्त इकोफ्रेन्ड्ली आहे. उन्हाळ्यात इथे थंडावा राहतो, तर हिवाळ्यात ऊब मिळते.
हागणदारीमुक्तीसाठी आपल्याकडे अमिताभ बच्चनपासून विद्या बालनला जाहिराती कराव्या लागतात. पण तळागाळात काम करणाऱ्या या कलाकारांनाही थोडं पाठबळ मिळायला हवं.