सांगली : कृष्णा नदीच्या पात्रात एका मगरीचे मुंडके सापडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. कसबे डिग्रज येथील बंधाऱ्यावर एका मगरीच्या मुंडक्याचा भाग सापडला असून या मगरीची कोणीतरी निघृणपणे हत्या झाल्याचा संशय वन विभागाला आहे.
मगरीचे मुंडेक सापडले असून, उर्वरित धड सापडले नाही. त्यामुळे उर्वरित धड कुठे आहे, याचा शोध वनविभागाचे अधिकारी घेत आहेत. त्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बंधाऱ्यापासून चार किलोमीटर असलेल्या तुंगपर्यत शोध सुरु केला आहे.
दरम्यान, वन विभागाने या मगरीच्या मुंडक्याचे पोस्टमार्टम केले असून, त्यात डोक्यावर जखम दिसून आली आहे. त्यामुळे या मगरीची धारदार शस्त्राने हत्या केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यानुसार वनविभागाने अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. काही महिन्यांपूर्वी कृष्णा नदी पात्रातच तुंगजवळ मृत मगर आढळून आली होती. त्यानंतर हा दुसरा प्रकार समोर आल्याने यावर प्राणीमित्रांनी संताप व्यक्त केला आहे.