अहमदनगर: शिर्डीमध्ये 17 मार्च ते 22 मार्च या दरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लावण्याचा आदेळ जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे गुरुवारच्या पालखीसह रथोत्सवाला स्थगिती देण्यात आली आहे. यासंबंधी साई संस्थानच्या वतीनं साईभक्तांना आणि ग्रामस्थाना सहकार्याचे आवाहन करण्यात आलं आहे. 


अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांनी 14 मार्च 2022 रोजी एक प्रतिबंधात्‍मक आदेश जारी केला होता. त्यामध्ये जिल्‍ह्यात कोणत्‍याही किरकोळ घटनेवरुन कायदा व सुव्‍यवस्‍थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, किंबहुना तशी परिस्थिती निर्माण झाल्‍यास ती हाताळण्‍यासाठी पोलीसांना मदत व्‍हावी म्‍हणून 17 मार्च ते 22 मार्च 2022 पर्यंतचे साई मंदिरातील उत्‍सव, श्रींची गुरुवारची पालखी व रंगपंचमी निमित्ताने निघणारी रथयात्रा मिरवणूक पुढील आदेश होईपर्यंत स्‍थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.  


प्रतिबंधात्‍मक आदेशान्‍वये अहमदनगर जिल्‍ह्यात शहरी आणि ग्रामीण भागात आगामी काळात 17 मार्च रोजी होळी, 18 मार्च रोजी धुलीवंदन, 21 मार्च रोजी तिथीप्रमाणे शिवजंयती आणि 22 मार्च रोजी रंगपंचमी हे उत्‍सव साजरे केले जाणार आहेत. सध्‍या कोरोना विषाणूच्‍या ओमॉयक्रॉन व्‍हेरियंटचा प्रादुर्भाव देखील राज्‍यात चालू आहे. सदर उत्‍सवाच्‍या दरम्‍यान गर्दी होण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही. तसेच जिल्‍ह्यामध्‍ये विविध राजकीय पक्ष, कामगार संघटनांतर्फे त्‍यांच्‍या प्रलंबित मागण्‍यासाठी मोर्चे, धरणे आंदोलने, रास्‍ता रोको होतात. सध्‍या जिल्‍ह्यात यात्रा, उत्‍सव तसेच धार्मिक कार्यक्रम साजरे होतात. 


या दरम्यान मोठ्या प्रमाणात गर्दी होण्‍याची शक्यता लक्षात घेता जिल्‍हयात कोणत्‍याही किरकोळ घटनेवरून कायदा व सुव्‍यवस्‍थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये यासाठी 17 मार्च ते 22 मार्चपर्यंतचे उत्‍सव, श्रींची गुरुवारची नित्‍याची पालखी आणि रंगपंचमी निमित्ताने निघणारी रथयात्रा मिरवणूक पुढील आदेश येईपर्यंत स्‍थगित करण्यात येणार आहे. सर्व भाविकांनी याची नोंद घ्‍यावी आणि सर्व साईभक्‍तांनी तसेच ग्रामस्‍थांनी याबाबत संस्‍थानला सहकार्य करावे, असे आवाहन संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांनी केले आहे. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha