मुंबई : राज्यात गुंडगिरी धुमाकूळ सुरुच असताना आज (1 मार्च) थेट विधानसभेच्या लाॅबीत शिंदे गटातील आमदार भिडल्याने एकच खळबळ उडाली. दोन्ही आमदार एकमेकांना भिडल्याने मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) आणि भारत गोगावले (Bharat Gogawale) यांनी मध्यस्थी करून वादावर पडदा पाडला. दरम्यान, असा वाद झालाच नाही, असा दावा करणाऱ्या शंभूराज देसाई यांना तोंडावर पाडत आमदार महेंद्र थोरवे यांनी (Mahendra Thorve on Dada Bhuse) दादा भूसेंवर सडकून टीका केली आहे. मी तुमच्या घरचं खात नसल्याचे म्हणत थोरवे यांनी दादा भूसे नकारात्मक मंत्री असल्याचे म्हटले आहे.
महेंद्र थोरवे काय म्हणाले?
महेंद्र थोरवे म्हणाले की, बाळासाहेबांनी शिकवलं आहे, तोंड वाजवून न्याय मिळत नसेल तर तोंडात मारून न्याय मिळवा. दादा भुसे एकदम नकारात्मक मंत्री आहे. माझ्या मतदारसंघातलं काम होत नाही हे विचारलं तर माझ्यावर आवाज चढवला. या कामासाठी मुख्यमंत्री तसेच श्रीकांत शिंदेंनी फोन केला होता. आमदारांची कामं होत नसतील तर काय करणार? आम्ही शिवसैनिक आहोत स्वाभिमानी आहोत आम्ही सरपंच नाही तर लाखो लोकांचे प्रतिनिधित्व करतो, असे ते म्हणाले.
मंत्री असणारे दादा भुसे यांच्याकडे मी कामानिमित्ताने गेलो होतो. दोन महिन्यांपासून पाठपुरावा करत आहोत. आमदार भरत गोगावले असतील मी स्वतः असेल, आम्ही कामाचा पाठपुरावा करत आहोत. माझ्या मतदारसंघातील कामाबाबत मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दादा भुसे यांना कॉल करून सांगितलेलं होतं. खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी सुद्धा त्यांना कॉल करून सांगितले की काम करून घ्या. परंतु दादा भुसेंनी सांगून सुद्धा त्यांनी जाणीवपूर्वक काम केलं नाही. आज मी त्यांना त्याबाबत विचारलं की, दादा बाकीच्या लोकांची कामं झाली, त्यासाठी काल तुम्ही मीटिंग घेतली, पण मी सांगितलेलं कामं, मुख्यमंत्र्यांनी सांगून सुद्धा तुम्ही मीटिंगमध्ये घेतलं नाही.
बॉडी लँग्वेज आणि पाहण्याचा दृष्टीकोन वेगळ्या पद्धतीचा होता
मी त्यांना विचारायला गेलो, तर दादा भुसे माझ्यावर चिडून बोलले. मी विचार केला आम्ही स्वाभिमानी आमदार आहोत, आम्ही मुख्यमंत्र्यांबरोबर प्रामाणिकपणे आहोत, तुमच्यावर मुख्यमंत्र्यांनी जबाबदार दिली आहे मंत्री म्हणून, त्यांनी आमदारांची कामे प्रामाणिकपणे त्या ठिकाणी केली पाहिजेत. अशा पद्धतीने आम्हाला उत्तर देऊन आम्ही आमचा स्वाभिमान विकणार नाही. त्यामुळे मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की मी काही तुमच्या घरी खायला येत नाही. तुम्ही मी सांगितलेलं काम जे आहे ते जनतेचे काम आहे. मला त्या ठिकाणी काम झालं पाहिजे. माझ्या मतदारसंघातलं काम आहे आणि ते काम तुम्ही त्या ठिकाणी करून द्या, असं सांगितलं. परंतु त्यांची बॉडी लँग्वेज आणि पाहण्याचा दृष्टीकोन वेगळ्या पद्धतीचा होता. म्हणून आमच्यात थोडीची शाब्दिक चकमक झाली.
काय म्हणाले होते शंभूराज देसाई?
तत्पूर्वी, शंभूराज देसाई यांनी वाद झालाच नसल्याचा दावा केला होता. ते म्हणाले की, शिवसेनेच्या कोणत्याही आमदारांची धक्काबुक्की झालेली नाही. कोणताही वाद झालेला नाही. माध्यमांमध्ये आलेल्या बातम्या अत्यंत चुकीच्या आणि निराधार आहेत. मी आता माध्यमांना एक प्रश्न विचारतो की, विधानसभेच्या लॉबीमध्ये केवळ विधिमंडळ सचिवालयाचेच कॅमेरे आहेत, माध्यमांचा कुठल्याही कॅमेरा आत नाही. मग वाद झाला हे कोणत्या आधारे बातम्या दाखवल्या? शिंदे गटाचे आमदारांमध्ये वाद असं बिलकुल झालेलं नाही. मी तिथे होतो. एक मंत्री महोदय आणि एक आमदार महोदय चर्चा करत होते. त्याठिकाणी त्यांची चर्चा चालू होती आणि चर्चा चालू असताना, त्यांचा आवाज थोडासा वाढला. याच्याबाबत एकमेकांच्या अंगावर गेले, शिंदे गटाचे आमदार आणि मंत्र्यांमध्ये वाद-विवाद झाला असं बिलकुल झालेलं नाही.
मी तिथे गेल्यानंतर विकासकामांवर चर्चा सुरु होती. त्यावेळी मोठ्या आवाजात चर्चा सुरु असताना मी संबंधित मंत्री महोदयांना आणि संबंधित आमदारांना लॉबीमध्ये घेऊन गेलो. आम्ही दोघांनी एकत्र चर्चा केली आणि त्या चर्चेतून अधिवेशन संपल्यानंतर त्या आमदारांच्या कामावर उद्यापासून मार्ग काढायचा ठरलं आहे. त्यामुळे वाद झालेला नाही.
इतर महत्वाच्या बातम्या