मुंबई : शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीला अखेर साडे सहा वर्षानंतर जेलबाहेर आली आहे.  सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आल्यानंतर गुरुवारी मुंबईतील विशेष सीबीआय कोर्टानं त्यावर शिक्कामोर्तब केलं.  दोन लाखांच्या जातमुचलक्यावर आणि तेवढ्याच किंमतीच्या हमीवर न्यायालयानं इंद्राणीची भायखळा जेलमधून सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत


इंद्राणी मुखर्जी साडे सहा वर्षांनंतर जेलमधून बाहेर आल्या आहेत.  जेलमधून बाहेर येण्यापेक्षा त्यांच्या मेकअपची चर्चा सध्या सुरू आहे. तसेच तुरूंगात या सुविधा देखील मिळतात का? असा सवाल देखील उपस्थित होत आहे. इंद्राणी मुखर्जी  तुरुंगातून बाहेर पडल्या की ब्यूटी पार्लरमधून बाहेर पडल्या? हेच कळेनासं झालं आहे.  पांढरा शुभ्र कुर्ता... कंप्लीट मेकओव्हर असा त्यांचा लूक होता.


विधानसभेत भाजप आमदार आशिष शेलार यांनी 2017 साली  , इंद्राणी मुखर्जी या कारागृहात मसाज, पेडिक्‍युअर, फेशियल अशा सुविधा घेत होत्‍या, असा आरोप केला होता.तुरूंगातून बाहेर येताना छगन भुजबळ दाढी वाढवून येतात. अनिल देशमुख मध्येच पांढऱ्या केसांनी भरलेले दिसतात आणि रवी राणा आणि नवनीत कौर राणाही थकलेले दिसतात. या सगळ्यांनी इंद्राणीकडे धडे घेण्याची गरज आहे. जसा सेलिब्रिटींचा जसा एअरपोर्ट लूक... रेट्रो पार्टी लुक असतो ना... तसा जेल लुकचा कोर्स इंद्राणीने सुरु केला का अशी चर्चा सुरू आहे


इंद्राणी मुखर्जीला तिची मुलगी शीना बोरा हिच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी साल 2015 मध्ये अटक केली होती. तेव्हापासून इंद्राणी मुंबईतील भायखळा येथील महिला मध्यवर्ती कारागृहातच आहे. त्यादरम्यान इंद्राणीकडून असंख्यवेळा जामीनासाठी सत्र न्यायालयापासून हायकोर्टापर्यंत अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र, न्यायालयानं प्रत्येकवेळी तिचा अर्ज फेटाळून लावला होता. नुकताच इंद्राणीने सर्वोच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. तेव्हा, खटल्याचे स्वरुप पाहता खटला अनेक वर्ष चालणार आहे. तसेच इंद्राणीने एकदाही पॅरोल घेतला नसून मागील साडेसहा वर्षांपासून कारागृहात आहे. त्यामुळे तिला जामीन मंजूर करत असल्याचे स्पष्ट केलं.


सर्वोच्च न्यायालयानंतर विशेष न्यायालयानेही इंद्राणीला जामीन दिला असला तरीही कायदेशीर कागदपत्रांची पुर्तता न झाल्यामुळे इंद्राणीला गुरुवारची रात्रही कारागृहातच काढावी लागली. शुक्रवारी संध्याकाळी कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर इंद्राणीची साडेपाचच्या दरम्यान जेलमधून सुटका झाली आहे.  


काय आहे प्रकरण?


24 एप्रिल 2012 रोजी शीना बोराची हत्या करण्यात आली होती. इंद्राणीचा चालक शामवर राय याला बेकायदेशीर हत्या बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर केलेल्या चौकशी दरम्यान या हत्याकांडाचा साल 2015 मध्ये उलगडा झाला. इंद्राणीने आपला पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्ना आणि ड्रायव्हर शामवर राय यांच्यासोबत मिळून आपल्या पहिल्या पतीपासूनची मुलगी शीनाची हत्या केली आणि 25 एप्रिल 2012 रोजी तिच्या मृतदेहाची पनवेलनजीक विल्हेवाट लावल्याचं समोर आलं होतं. याप्रकरणी इंद्राणीचा पती पीटर मुखर्जी यालाही या कटात सहभागी असल्याच्या आरोपावरून अटक झाली होती.