पंढरपूर : यंदा पालखी सोहळ्याच्या वाटेत विकासकामांचा अडसर या बातमीत एबीपी माझाने पालखी मार्गातील अडचणी समोर आणल्यावर काल (19 मे) जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी वारकरी प्रतिनिधी आणि रेल्वे प्रशासन सोबत बैठक घेऊन एक अडसर दूर केला आहे. त्यामुळे यंदाही परंपरेनुसार 10 मानाच्या पालख्या सरगम चौकातील रेल्वे रुळावरुनच जाणार आहेत. याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, रेल्वेचे अधिकारी विभागीय विद्युत अभियंता पराग आकनूरवार, विभागीय वित्तीय व्यवस्थापक प्रदीप हिरडे, विभागीय ऑपरेशन व्यवस्थापक एल.के. रानयेवले आणि पालखी संस्थानचे प्रतिनिधी यांच्यामध्ये चर्चेतून तोडगा निघाला आहे.
आषाढी वारीला मानाच्या 7 पालख्या येतात, यात आणखी तीनची भर पडली आहे. मानाच्या 10 पालख्यांच्या धातूच्या रथाची उंची 15 ते 20 फुटांपर्यंत आहे. यामुळे सरगम चौकातील रेल्वे पुलाच्या खालून जाता येत नसल्याने रेल्वे रुळावरुन पालख्या जात होत्या. ही परंपरा खूप वर्षांची आहे. मात्र रेल्वेने यंदा रेल्वेचे विद्युतीकरण केल्याने 5.80 मीटर उंचीवरुन हाय व्होल्टेज वायर जात असल्याने पालखी सोहळे पंढरपूर शहरात कसे येणार हे वास्तव दाखवले होते. यावर तोडगा काढण्यासाठी नियोजन भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले की, "कोरोनाचे निर्बंध हटवल्याने वारीचा उत्साह मोठा आहे. यामुळे यंदा 15 लाख भाविक येण्याची शक्यता आहे. वारकरी संप्रदाय, प्रथा-परंपरा यांना महत्व आहे. मानाच्या पालख्यांचा मार्ग बदलणे योग्य ठरणार नाही. रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी वारकरी परंपरेचा मान राखून पर्याय सूचवावे. वारकरी संस्थानांना विनंती की त्यांनी आपापले रथ, पालखी कमीत कमी वेळेत रेल्वे रुळ पार करावा. रथ किंवा पालखीवरुन गेली तर इतर वारकऱ्यांनी पुलाच्या खालून जावे." "मानाच्या पालख्या सोडून इतर पालख्या रेल्वे रूळाखालून किंवा इतर मार्गाने नेण्यात याव्यात," असे आवाहनही त्यांनी केले.
विभागीय विद्युत अभियंता आकनूरवार यांनी सांगितले की, "रेल्वेची भूमिका प्रथा-परंपरेनुसार सामजस्याची राहील. कुर्डूवाडी ते सांगोला विद्युत पुरवठा स्थगित करावा लागेल किंवा पालख्या जाईपर्यंत विद्युत तार हटवावी लागेल." दुसरा पर्याय वारी कालावधीत रेल्वे विद्युत इंजिनऐवजी डिझेल इंजिनचा राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रांताधिकारी तथा विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी 10 मानाच्या पालख्यांची माहिती दिली. संत तुकाराम महाराज रथाची उंची सर्वात जास्त 20 फूट आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, श्रीक्षेत्र आळंदी (रथाची उंची 15 फूट), श्री संत तुकाराम महाराज संस्थान, श्रीक्षेत्र देहू (रथाची उंची 20 फूट), श्री संत सोपानदेव समाधी मंदिर ट्रस्ट, श्रीक्षेत्र सासवड (रथाची उंची 14 फूट), श्री संत निवृत्तीनाथ समाधी संस्थान, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर (रथाची उंची 12 फूट), श्री संत मुक्ताई देवस्थान, मुक्ताईनगर (रथाची उंची-15 फूट), श्री संत एकनाथ महाराज देवस्थान संस्थान, श्रीक्षेत्र पैठण (रथाची उंची-14 फूट), श्री नामदेव महाराज संस्थान, श्रीक्षेत्र पंढरपूर (रथाची उंची 14 फूट), श्री चांगावटेश्वर देवस्थान, सासवड (रथाची उंची 14 फूट), विठ्ठल-रुख्माई संस्थान कौंडण्यपूर (रथ नाही, वाहनातून पालखी) आणि श्री संत निळोबाराय संस्थान, पिंपळनेर (रथाची उंची 12 फूट) या पद्धतीने रथांची उंची आहे.
बैठकीला संत सोपानदेव पालखी संस्थानचे मनोज रणवरे, संत मुक्ताबाई संस्थानचे शशिकांत पाटील, ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे पुरुषोत्तम उत्पात, सोपानदेव समाधी संस्थानचे सिद्धेश शिंदे, चांगावटेश्वर संस्थानचे अरुण दरेकर, शशिकांत जगताप आदी उपस्थित होते.