जालना : जालन्यात (Jalna News) पोलिसांकडून मराठा आंदोलकांवर काल  झालेल्या लाठीमारानंतर मराठा समाज संतप्त झाला आहे. जालन्यासह राज्यभर तणावाचे वातवरण आहे. या पार्श्वभूमीवर  8 सप्टेंबरला  जालना येथे होणाऱ्या  शासन आपल्या दारी या कार्यक्रमाची तारीख पुढे ढकलली आहे.  यापूर्वी दोन वेळा या कार्यक्रमाची तारीख बदलण्यात आली होती. आता मराठा आरक्षणाचे आंदोलन चिघळल्यानंतर तिसऱ्यांदा या कार्यक्रमाची तारीख बदलण्यात आली आहे. आता हा कार्यक्रम 16 सप्टेंबरला जालन्यात पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे. 


जालन्यातील अंतरवाली सराटी गावामध्ये मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरु होतं. मात्र उपोषणकर्ते आणि पोलिसांमध्ये वाद झाला. त्याचं रुपांतर झटापटीत झालं. त्यानंतर तिथं दगडफेक झाली. पुढे आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला. हे कमी म्हणून की काय हवेत गोळीबारही केला. पोलिसांच्या या कारवाईविरोधात राज्यभर संताप व्यक्त होतोय. या प्रकरणी 16 आरोपीसह 300 ते 350 अज्ञात लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. जालन्यातील गोंदी पोलीस ठाण्यात त्यांच्यावर कलम 307, 333 यांसह सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेत. यातील 16 आरोपींची ओळख पटली आहे. पोलिसांना कट करून जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, यासह खासगी आणि सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान केल्याप्रकरणी प्रशासनाकडून आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आलेत.


यापूर्वी दोन वेळा मुहूर्त हुकला...


शासन आपल्या दारी या राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी अभियानातंर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत जालना शहरात शासन आपल्या दारी कार्यक्रम 8 सप्टेंबरला पार पडणाक आहे.  पण यापूर्वी 25 जून आणि 18 ऑगस्ट रोजी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. तसेच या नियोजित कार्यक्रमाच्या अनुषंगाने पूर्वतयारीबाबत केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक देखील पार पडली होती. मात्र,मराठा आंदोलनामुळे पुन्हा एकदा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.


या घटनेनंतर सोलापूर-औरंगाबाद महामार्गावर महाकाळा, वडिगोद्री, शहागडमध्ये एसटी पेटवण्यात आली. पोलिसांची गाडीही पेटवली. तिकडे सोलापूर धुळे मार्गावरील वडीगोद्रीत जाळपोळ करण्यात आली. 29 ऑगस्टपासून मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह 10 जण आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसले होते. त्यांंच्या समर्थनासाठी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. उपोषणाचं आंदोलन चिघळू नये यासाठी काल पोलिसांकडून उपोषणकर्त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर वरील सर्व प्रकार घडला. पोलिसांनी काल शांतता प्रस्थापित प्रयत्नही केले मात्र  आजही काही भागात तणाव कायम आहे. सध्या पोलीस शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सध्या सुरु आहे. 


हे ही वाचा :


जालना शहरात पुन्हा दगडफेक आणि लाठीचार्ज, ग्रामीण भागातील लोण आता शहरातही; पोलिसांकडून शांतता राखण्याचे आवाहन