मुंबई : राज्यपाल आणि महाविकास आघाडीतील 'मधुर' संबंध सर्वश्रुत आहे. सरकार आणि राज्यपालांमध्ये सतत काही ना काही विषयांवरुन वादविवाद सुरु असतात. यात आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उडी घेतलीय. राज्यपालांनी शरद पवार यांना कॉफी टेबल पुस्तक पाठवले होते. त्याला शरद पवार यांनी पत्र लिहून उत्तर दिले आहे.
पवारांनी लिहिलेल्या या पत्रात राज्यपालांवर चांगलीच शेरेबाजी केली आहे. या पत्रात पवारांनी म्हटलं आहे की, पुस्तकात मुख्यमंत्र्यांना आपण दिलेल्या सल्ल्याची व त्या उपरांत केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतलेल्या दखलेची नोंद या पुस्तकात दिसून आली नाही. भारतीय संविधानात जनराज्यपाल असा उल्लेख आढळत नाही. तरीही राज्य शासनाच्या वतीने सुबक छपाई असलेले आपल्या एक वर्षाच्या मर्यादित कालावधी प्रकाश टाकणारे स्व प्रसिद्ध कॉफी टेबल बुक पाठवण्यात आले याबद्दल धन्यवाद, असा टोला पवारांनी लगावला आहे.
पत्रात म्हटलं आहे की, पुस्तकात एखाद दुसरा प्रसंग वगळता शपथविधी स्वागत समारंभ दीक्षांत समारंभ सोहळे, उच्चपदस्थ गाठीभेटी सांस्कृतिक कार्यक्रम छायाचित्र आहेत. तसेच निधर्मवादा संदर्भात राज्याच्या माननीय नुख्यमंत्र्यांना आपण दिलेल्या सल्ल्याची व त्या उपरांत केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतलेल्या दखलेची नोंद या पुस्तकात दिसून आली नाही.
महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल सचिवालयातर्फे नुकतंच ' जनराज्यपाल : भगतसिंह कोश्यारी' नावाचं एक कॉफीटेबल बुक प्रकाशित केलं आहे. यात स्वतःचा जनराज्यपाल असा उल्लेख केला आहे. या उल्लेखावर देखील पवारांनी टोला लगावला आहे. आपण आठवणीने आपल्या ऐतिहासिक कारकिर्दीचा लेखाजोखा पाठवल्याबद्दल आभारी, असं देखील शरद पवारांनी शेवटी पत्रात म्हटलं आहे.