मुंबई :महाराष्ट्रावर एकहाती भगवा फडकवायचा आहे, शिवसैनिकांनो सज्ज व्हा, अशा शब्दात शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आवाहन केलं आहे.  काल रात्री 10 ते 1 वाजेपर्यंत जिल्हाप्रमुख आणि उद्धव ठाकरेंमध्ये बैठक झाली. या बैठकीत शिवसेनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांना ताकद देण्यात येईल, निधी उपलब्ध करण्यात थोड्या अडचणी आहेत पण त्यावरही आपण मात करू असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. जिल्हाप्रमुखांनी जिल्ह्या जिल्ह्यात विकास कामांवर भर द्यावा, अशा सूचना देखील ठाकरेंनी केल्या असल्याची माहिती आहे.


शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातून जनतेशी ऑनलाईन संवाद साधला होता. त्यात  त्यांनी म्हटलं होतं की,  राज्यातली महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याच्या गोष्टी काहीजण करत आहेत. त्यासाठी तारीख पे तारीख देत आहेत. हिंमत असेल तर त्यांनी सरकार पाडून दाखवा, असं आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलं. आम्ही गुळाला चिकटलेले मुंगळे नाहीत. महाराष्ट्र हा लेच्या पेच्यांचा प्रदेश नाही, हे वाघांचं राज्य आहे. जो महाराष्ट्रच्या हिताच्या आडवा येईल त्याला आडवा पाडून गुढी उभी करणार असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला होता.


भाजपने बिहारमध्ये नितीश कुमार यांना मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा दर्शवला आहे. हीच खेळी त्यांनी महाराष्ट्रात केली होती. एकीकडे पाठिंबा दाखवायचा आणि छुप्या मार्गाने दगा करायचा. मात्र आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकलोय. महाराष्ट्रातही हाच डाव होता, मात्र शिवसेनेनं हा डाव हाणून पाडला, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं.


देशात कोरोनाचं संकट असताना त्यांना राजकारण सूचतंय. निवडणुकीच्या तोंडावर बिहारमध्ये मोफत कोरोनाची लस देण्याची घोषणा करता. मग उर्वरित भारत काय बांगलादेश आहे का? त्यांच्याकडून पैसे घेणार का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला होता.


नुसत्या काळ्या टोप्या घालू नका, त्याखाली डोकं असेल हिंदुत्व समजून घ्या


हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला होता. नुसत्या काळ्या टोप्या घालू नका. त्याखाली डोकं असेल हिंदुत्व समजून घ्यावं. घंटा वाजवा, थाळ्या वाजवा, हे तुमचं हिंदुत्व. आमचं हिंदुत्व असलं नाही, हिंदुत्व हे आमचं राष्ट्रीयत्व आहे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. शिवसेनाप्रमुख यांचे हिंदुत्व आणि तुमचे हिंदुत्व यात फरक आहे, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला. इथं गाय म्हणजे माता आणि पलीकडे जाऊन खाता, हे कसले हिंदुत्व असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला होता.