नवी दिल्ली : राज्यात सत्तास्थापनेचा तिढा दिवसेंदिवस वाढत असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज (20 नोव्हेंबर) भेट घेणार आहे. संसद भवनामध्ये या दोन दिग्गज नेत्यांची भेट होणार आहे. दरम्यान आज संसद भवनात होणाऱ्या शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीबाबत विचारलं असता पवार-मोदी भेट नेहमी खिचडीच नसते, असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तरीही या बैठकीत राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे पूर्ण राज्याचे लक्ष या भेटीकडे लागले आहे.


शरद पवारांना शेतीबाबत अधिक माहिती आहे. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे जर एखादी समस्या असेल तर कोणीही त्यांची भेट घेऊ शकतं, असंही संजय राऊत म्हणाले. अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. नागपूर दौऱ्यावर असताना शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या सर्व समस्या घेऊन पंतप्रधानांना भेटणार असल्याचे सांगितले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्यानंतरसरकार स्थापनेबाबत सोनियांशी चर्चा झाली नाही, असं सांगितलं होत. तसंच "आघाडीतल्या मित्रपक्षांना नाराज करु शकत नाही, त्यांना विश्वासात घेऊनच निर्णय घेणार," या शरद पवारांच्या विधानानंतर राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते बुधवारी (20 नोव्हेंबर) संध्याकाळी नवी दिल्लीमध्ये भेटणार आहेत. त्यांच्यामध्ये काय चर्चा होणार हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे आहे.

Sharad Pawar | शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट | ABP Majha



महाराष्ट्रात एक मजबूत सरकार डिसेंबरपूर्वी स्थापन होईल, सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरु असून महाराष्ट्रात सध्या राष्ट्रपती राजवट लागू आहे. त्यामुळे काही कायदेशीर बाबीही लक्षात घ्याव्या लागतात. परंतु जेव्हा राज्यपालांकडे आम्ही बहुमताचा आकडा सिद्ध करू त्यावेळी ते आम्हाला सराकर स्थापन करण्यासाठी निमंत्रण देतील . ही एक प्रक्रिया आहे. याआधीही देशात असं झालेलं आहे. जेव्हा एखाद्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाते. त्यावेळी सरकार स्थापनेसाठी याच प्रक्रियेतून सर्वांना जावं लागतं. येत्या 5 ते 6 दिवसांत सत्तास्थापनेची प्रक्रिया पूर्ण होईल, उद्या दुपारपर्यंत सत्तास्थापनेचं चित्र स्पष्ट होईल, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.