मुंबई : गेल्या 26 दिवसांपासून सुरु असलेला सत्तास्थापनेचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता आहे. कारण, येत्या 25 तारखेच्या आसपास महाशिवआघाडीच्या सरकारचा शपथविधी होईल, असा दावा शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी केला आहे. 'एबीपी माझा'ला दिलेल्या खास मुलाखतीत सत्तार यांनी हे भाकित वर्तवलं आहे.


दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांना तातडीने मुंबईत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. सोबत आधार कार्ड, पॅन कार्ड असे ओळखपत्र, तर चार-पाच दिवस राहावं लागेल, अशा तयारीने येण्याचे आदेश दिले आहेत.

महाशिवआघाडीचं सरकार बनेल यात शंका नाही
सरकार स्थापनेविषयी अब्दुल सत्तार म्हणाले की, "मातोश्रीवर अंतिम चर्चा होईल आणि आठवड्यभरात नवी सरकार येईल, अशी माहिती मला सूत्रांकडून मिळाली आहे. महाशिवआघाडीचं सरकार बनेल यात अजिबात शंका नाही. दोन दिवसात मसुदा तयार होऊन शिक्कामोर्तब होईल. तिन्ही पक्ष सकारात्मक भूमिकेने सरकार स्थापन करतील. 25 तारखेच्या आसपास, एखादा दिवस कमी जास्त होऊ शकतो, पण सरकार स्थापन होईल."

पाच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल!
दरम्यान, मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, असा दावाही अब्दुल सत्तार यांनी केला आहे. "महाराष्ट्राची जनता, शेतकरी सरकारची वाट पाहत आहे. पक्षाचे कार्यकर्त्यांनाही लवकरात लवकर सरकार स्थापन व्हावी अशी इच्छा आहे. पाच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल. अडीच वर्ष मागितलं होतं, पण आम्हाला हक्काचं पद मिळालं नाही. शेतकऱ्यांच्या विषयाकडे तिन्ही पक्ष गांभीर्याने पाहू लागले. पहिल्या कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांना न्याय देता येईल."

पॅनकार्ड, आधारकार्ड आणण्याचे आदेश : सत्तार
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदारांना बोलावणं धाडलं आहे. याविषयी अब्दुल सत्तार म्हणाले की, "सर्व आमदारांना शुक्रवारी 12 वाजेपर्यंत मातोश्रीवर हजर राहण्याचे आदेश मिळाले आहेत. येताना तयारीनिशी येण्यास सांगितलं आहे. पॅनकार्ड आणि आधारकार्ड आणण्याचे आदेश दिले आहेत. सही तसंच फोटो आमदारांचाच आहे याची माहिती राज्यपालांना लागेल, त्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेतली जात असेल, असं मला वाटतंय."