पुणे : काही पक्षांना केवळ निवडणुकांच्या वेळी राम मंदिराची आठवण होते. असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच सत्ताधारी पक्षाचे नेते मराठा आरक्षणावरुन लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत, असे प्रतिपादनही त्यांनी केले. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी निर्धार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शरद पवार बोलत होते


पवार म्हणाले की, "काही पक्षांना निवडणूका आल्या की राम मंदिराची आठवण येते. साडेचार वर्षे तुमचे सरकार आहे मग इतके दिवस तुम्ही काय केले? मंदीराच्या नावाखाली हे सर्व उधवस्त करण्याचे काम सुरू आहे."

मराठा आरक्षणाविषयी पवार म्हणाले की, "एककिडे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आरक्षण देतात, तर दुसरीकडे त्यांच्या पक्षाचे प्रमुख तेलंगणात सांगतात की 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण हा वेडेपणा आहे. 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण टिकणार नाही. यावरुन लक्षात येते की, सत्ताधारी पक्षाचे नेते आरक्षणावरुन लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत."

यावेळी शरद पवारांनी विविध मुद्द्यांना हात घातला. येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माहिती देताना पवार म्हणाले की, "भाजपला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी आघाडीचा प्रयोग अपरिहार्य आहे. त्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र यायलाच हवे, अशी अपेक्षा पवारांनी आज व्यक्त केली.

येत्या निवडणुकांमध्ये राज्यातल्या प्रादेशिक पक्षांना सोबत घेतले जाईल. प्रादेशिक पक्षांची ताकद लक्षात घेऊनच जागावाटप केले जाईल. भाजपला पराभूत करण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र यायला हवे, त्यासाठी मी दिल्लीला जात आहे. दिल्लीत भाजपविरोधी पक्षांना एकत्र करण्यासंदर्भात बैठक असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली.