रत्नागिरी : रत्नागिरीतल्या चिपळूण दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांनी (Sharad Pawar) वेगवेगळ्या मुद्द्यावरून सरकारवर हल्लाबोल केलाय. मालवणमधील महाराजांचा पुतळा वाऱ्यामुळे पडला, सरकारकडून दिल्या जाणाऱ्या या स्पष्टीकरणावरून शरद पवारांनी आसूड ओढले. मुंबई-गोवा हायवेसह राज्यातल्या इतर रस्त्यावरून पवारांनी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केलाय. सत्ता डोक्यात गेलेल्यांना भानावर आणावं लागलं अशा शब्दात शरद पवारांनी राणे पितापुत्रांवर प्रहार केलाय.
शरद पवार म्हणाले, महाराजांच्या पुतळ्यात पण पैसे खायचं काम केलं आहे. भ्रष्टाचार कुठल्या पातळीवर पोहचला याच हे उदाहरण आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा नौदलाकडून तयार केला असं सरकारकडून सांगण्यात आलं. वारा जास्त आल्यामुळे पुतळा पडल्याचे राज्य सरकार सांगत आहे. गेट वे ऑफ इंडियाच्या शेजारी उभा असलेल्या पुतळ्याला कधीही धक्का बसला नाही आणि सिंधुदुर्गमधला पुतळा वाऱ्याने पडला असे सांगतात.
भ्रष्टाचाराला मर्यादा राहिलेल्या नाहीत : शरद पवार
कराड चिपळूण मार्गाच्या अवस्थेवरुन शरद पवार यांची राज्य सरकारवर टीका केली आहे. शरद पवार म्हणाले, आयुष्यात अशा पद्धतीचा रस्ता कधीही पाहिला नाही. एखादा जर पेशंट हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला तर तो हॉस्पिटलमध्ये पोहचणार नाही. तीन वेळा दुरुस्त करुन रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. पुण्यात ज्या खड्ड्यात ट्रक पडला तो रस्ता हल्ली तयार केलेला आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे, भ्रष्टाचाराला मर्यादा राहिलेल्या नाहीत, असे शरद पवार म्हणाले.
सत्ता तुमच्या डोक्यात गेलीय : शरद पवार
नारायण राणेंवर देखील शरद पवारांनी निशाणा साधला केला आहे. शरद पवार म्हणाले, नारायण राणेंचे चिरंजीव ज्या पद्धतीने वक्तव्य करतात अशी भाषा कोणत्या माजी मुख्यमंत्री यांच्या पुढच्या पिढीने केलेली नाही. सत्ता तुमच्या डोक्यात गेलीय. ज्यावेळी सत्ता डोक्यात जाते तेव्हा त्यांना भानावर आणावं लागते. सत्ता येते आणि जाते...ती येते तेव्हा पाय जमिनीवर ठेवायचे असतात. नसेल तेव्हा चिंता करायची नसते.
महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला चांगली साथ दिली : शरद पवार
400 पार म्हणणाऱ्या मोदींना जनतेनं 240 जागा दिल्या आहेत. आज नितिश कुमार आणि चंद्राबाबू यांच्या दोन पक्षांची मदत घेतली नसती तर सरकार बनल नसतं. तरीही यांना अजून समज येत नाही. महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला चांगली साथ दिली . प्रगतीच्या रस्त्यावर जायचं असेल तर महाविकास आघाडीसोबत राहा, असेही शरद पवार म्हणाले.
हे ही वाचा :