पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांना जाहीर कार्यक्रमावेळी तंबी दिली. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला उपस्थित असताना आपल्या भाषणात केवळ बंधूंनो, बंधूंनो म्हणण्यावरुन शरद पवार यांनी भरणे यांना जाहिरपणे सुनावलं.


"कार्यक्रमाला 90 टक्के महिला उपस्थित असताना भाषणात तुम्ही केवळ बंधूंनो.. बंधूनो.. म्हणून महिलांकडे दुर्लक्ष करत असाल, तर येणाऱ्या निवडणुकीत काय होईल ते पाहा," असा इशाराच शरद पवारांनी दत्तात्रय भरणे यांना दिला.

इंदापूर बाजार समितीने आयोजित केलेल्या शरद कृषी महोत्सवाचा शनिवारी समारोप झाला. या कार्यक्रमाला शरद पवार यांच्यासह खासदार विजयसिंह मोहिते पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार दत्तात्रय भरणे, आमदार बबनदादा शिंदे, आमदार नारायण पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमाला महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

कार्यक्रमात भाषण करताना आमदार दत्तात्रय भरणे यांनी अनेकदा बंधूंनो, बंधूंनो असा उल्लेख केला. त्यावरून शरद पवार यांनी आपल्या भाषणात दतात्रय भरणे यांना तंबी दिली. ते म्हणाले की, "इथे ९० टक्के महिला आहेत हे तरी लक्षात घ्यायला हवे होते. इतक्या मोठ्या संख्येने महिला उपस्थित असताना केवळ बंधूंनो बंधूंनो म्हणाल, तर काय होईल ते तुम्हाला निवडणुकीत समजेल, अशी तंबी देत यापुढे असे काहीही करु नका असा सल्लादेखील पवारांनी आमदारांना दिला.