मुंबई : भाजपला उतरती कळा लागली आहे असं म्हणत शरद पवार यांनी झारखंडच्या जनतेचे शरद पवार यांनी आभार मानले आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर योग्य वेळी लोक केंद्र सरकारला झारखंडसारखं उत्तर देतील असही म्हणत शरद पवार यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. समाजात धार्मिक अंतर वाढवण्याचा प्रयत्न होत आहे असं म्हणत शरद पवार यांनी नागरिकत्व दुरूस्ती कायद्यावरून टीका केली आहे. तसंच पंतप्रधान जे सांगतात आणि वस्तूस्थिती जी असते त्यात तफावत असते असंही ते म्हटले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अहंकारी राजकारणाला झारखंडच्या जनतेने नाकारलं अशी टीका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली आहे. केंद्रातली सत्तेची ताकद आणि आर्थिक ताकद वापरुनही झारखंडच्या जनतेने भाजपाला स्वीकारलं नाही. त्याबद्दल मी झारखंडच्या जनतेचे धन्यवाद देतो असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं. सिल्व्हर ओक या ठिकाणी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

झारखंडसह, महाराष्ट्र मध्यप्रदेश, छत्तीसगड, राज्यस्थान या पाच राज्यातून भाजपा हद्दपार झाली आहे. झारखंड या राज्यात आदिवासी व गरीब लोकांची संख्या जास्त आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारची वापरली गेलेली सत्तेची ताकद व आर्थिक ताकद न जुमानता इथल्या जनतेने भाजपाला नाकारले आहे असेही शरद पवार यांनी सांगितले. शरद पवार यांनी यावेळी नागरिकांना आवाहन केले. ' तुमचा राग शांत पद्धतीने दाखवा, जाळपोळ करू नका, असे आवाहनही शरद पवार यांनी यावेळी केले.

एनआरसीवर बोलताना शरद पवार म्हणाले, एनआरसी विषयावर एकत्र येऊन चर्चा केली पाहिजे. फक्त काही कम्युनिटीवर लक्ष केंद्रित केले. श्रीलंका, तामिळनाडू मधून ही लोक येतात. नेपाळहून लोक येतात. दिल्लीत माझ्याकडे लोक काम करतात,फक्त मुस्लिम येतात हे खरं नाही.

शरद पवार म्हणाले, सत्तेवर आलेल्या घटकांनी शांतपणे पावलं उचलायची असतात. आत्ताचे सत्ताधारी परिस्थिती चिघळेल अशी भूमिका घेताना दिसत आहेत. महाराष्ट्रातून रस्ता मिळाला, त्यातूनच झारखंडमध्ये भाजपाच्या विरोधात सगळे एकत्र आले असंही वक्तव्य शरद पवार यांनी केलं. झारखंड विधानसभा निवडणुकीत जनतेने भाजपाला धडा शिकवला. इतर राज्यांमध्येही संधी मिळाल्यानंतर जनताच भाजपाला धडा शिकवेल असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. सीएए आणि एनआरसी आणून सरकार स्वतःचं अपयश झाकण्याचा प्रयत्न करत आहे. तसंच समाजात धार्मिक अंतर वाढवण्याचाही या सरकारचा प्रयत्न आहे असाही आरोप शरद पवार यांनी केला.