नवी दिल्ली : राज्याच्या मंत्रिमंडळात अशोक चव्हाण दिसणार, पण पृथ्वीराज चव्हाण मात्र नसणार...दिल्लीतल्या हायकमांडच्या चर्चेत हा निर्णय आता जवळपास निश्चित झाला आहे. या दोन माजी मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळात कसं समाविष्ट करायचं याचा पेच होता. काँग्रेसचे हे दोनही माजी मुख्यमंत्री मुख्यमंत्री हट्टाने विधानसभा निवडणूक लढले. अशोक चव्हाण लोकसभेला पराभूत झाले, पण विधानसभेत जिंकले. तर दुसरीकडे पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा लोकसभेचा आग्रह नाकारत विधानसभेच्याच निवडणुकीला प्राधान्य दिलं. राज्यात अच्छे दिन येणार याची कुणकुण दोघांना लागली होती की माहिती नाही, पण सत्ता आल्यानंतर त्यांच्या मंत्रिपदाला मात्र हायकमांडकडून ग्रीन सिग्नल मिळताना दिसत नाही.


पृथ्वीराज चव्हाण यांना मिस्टर क्लीन समजलं जातं. ते खरंतर काँग्रेसच्या गांधी घराण्याशी निष्ठावंत मानले जातात. पण त्यांचा प्रॉब्लेम हा झालाय की त्यांची केमिस्ट्री जितकी सोनिया गांधींशी जुळत होती तितकी राहुल गांधींसोबत जुळत नाही. याचमुळे त्यांना मंत्रिपद देण्यापेक्षा इतर काही जबाबदारी द्यावी असं दिल्लीतून ठरत आहे.

पृथ्वीराज चव्हाण हे खरंतर राष्ट्रीय राजकारणात अधिक शोभणारे. पण गेल्या पाच वर्षांत त्यांनी राज्यातल्या राजकारणावर अधिक भर दिला. सरकारला धारेवर धरण्यात, नवेनवे मुद्दे शोधण्यात त्यांचा पुढाकार असायचा. पण तरीही अनेक काँग्रेस आमदार मात्र त्यांच्या कार्यशैलीवर नाराज असल्याचं बोललं जातं, मुख्यमंत्री म्हणून काम करताना त्यांनी क्लीन इमेज तर जपली, पण काँग्रेसच्या संघटनवाढीकडे मात्र पूर्ण दुर्लक्ष केलं असाही त्यांच्यावर आरोप होतो.

काँग्रेसच्या वाट्याला महसूल, उर्जा, पीडब्लूडी अशीच खाती आहेत. त्यातही महसूल खातं बाळासाहेब थोरात यांनाच मिळण्याची शक्यता आहे. अर्थ, गृह ही खाती मित्रपक्षांकडे आहेत. त्यामुळे उरलेल्या दुय्यम खात्यांसाठी माजी मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळात यावं का असाही सवाल काहीजण उपस्थित करत होते.

राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेचं सरकार बनवण्यात पृथ्वीराज चव्हाण यांचाही मोठा पुढाकार होता. शिवाय त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा कसलाही आरोप नाही. फडणवीसांच्या 80 तासांच्या सरकारला खाली खेचण्यासाठी सुप्रीम कोर्टातली महत्वाची लढाई लढण्यासाठीही त्यांच्यावर जबाबदारी होती. पण आता मोजकी मंत्रिपदं येत असताना पुन्हा जुन्यांचीच खोगीरभरती करण्यापेक्षा नव्या चेहऱ्यांना संधी मिळावी असा एक मतप्रवाह काँग्रेसमध्ये आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांना पक्षाकडून मंत्रिपदापेक्षा इतर काही मोठी जबाबदारी दिली जाणार का याची उत्सुकता आहे.