मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरासमोर झालेल्या आंदोलनामागे षडयंत्र असल्याचा युक्तीवाद आज सरकारी वकीलांनी केला. या आंदोलनाआधी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची नागपूरच्या एका व्यक्तीशी बोलणं झाल्याचं त्यांच्या चॅटमधून स्पष्ट झालं आहे अशी माहितीही सरकारच्या वतीनं न्यायालयात देण्यात आली. 


नागपूरच्या व्यक्तीसोबत व्हॉट्सअॅप कॉल 
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी या संदर्भात नागपूरच्या एका व्यक्तीसोबत बोलणं केल्याचं पोलिसांच्या तपासातून स्पष्ट झालं आहे. 6 तारखेला एक मिटींग झाली होती. त्यात हल्ला करण्याचं ठरवलं गेलं. अभिषेक पाटील नावाचा एसटी कर्मचारी सदावर्ते यांच्या संपर्कात होता. जो आरोपी देखील आहे. काही पत्रकारांना हल्ल्यावेळी बोलवलं गेलं. युट्यूब चॅनलवरील देखील पत्रकार होते. आरोपींचे सदावर्ते यांच्यासोबतचे काही चॅट पोलिसांच्या हाती लागले आहेत. 


आरोपी हे सकाळी 11.29 वाजता एक पर्यंत माध्यमांना करत होते आणि हल्ल्याची माहिती सांगत होते. संध्याकाळी 5.30 वाजता सदावर्ते यांनी चंद्रकांत सुर्यवंशींना कॉल केला. तर एक फोन नागपूर येथे करण्यात आला. त्याचे नाव आता आम्ही कोर्टात सांगू शकत नाही असं सरकारी वकिलांनी सांगितलं. 


नागपूरच्या व्यक्तीसोबत चर्चा
सदावर्ते यांचा नागपूरच्या एका व्यक्तीशी व्हॉट्सअॅप कॉल झाला होता. सकाळी 11.35  वाजता हा कॉल केला गेला होता. सोबतच दुसरा देखील एक कॉल केला गेला. दुपारी 1.38 वाजता नागपूरवरुन सांगण्यात आलं की आंदोलनाच्या ठिकाणी पत्रकार पाठवा. सदावर्ते आणि नागपूरच्या व्यक्तीमधील हे संभाषण हल्ल्याच्या दिवशीची झालं होतं. 


या संदर्भात 12 एप्रिलला बारामतीला काही तरी होणार आहे हे सूचित केलं गेलं होतं. नंतर मात्र 8 तारखेचा प्लॅन ठरला. दुपारी 2.42 पर्यंत व्हिज्युअस माध्यमांना कळवलं गेलं. या दरम्यान अॅड. गुणरत्न सदावर्ते हे कोर्टात होते असं सांगितलं जातंय. मात्र त्यांनी पूर्ण प्लान आखला होता आणि त्यावेळी ते मुद्दाम मॅट कोर्टात गेले होते.


एसटी कर्मचाऱ्यांकडून 1 कोटी 80 लाख रुपये जमा केले
दरम्यान, आरोपींनी एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे जमा केले असल्याची माहिती सरकारी वकिलांनी कोर्टात दिली आहे. त्यामध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याकडून 550 रुपये जमा करण्यात आले असून ही रक्कम 1.50 कोटी ते 1.80 कोटी रुपये इतकी असल्याचं सांगितलं जातंय. ही एवढी मोठी रक्कम गेली कुठे, कशासाठी वापरली, ही रक्कम शरद पवारांच्या घरासमोरील आंदोलनासाठी वापरली आहे का याचा तपास करायचा आहे असं पोलिसांच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे