मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी कांदा (Onion) खरेदीच्या निर्णयासाठी पंतप्रधान मोदी तसेच अमित शाह आणि पियुष गोयल यांचे आभार मानले आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, ''देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन आणि धन्यवाद. त्याचबरोबर गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे आभार. नाफेडने दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा घेतलेला निर्णय ऐतिहासिक आहे. पहिल्यांदाच पूर्वनिर्धारित 2410 प्रति क्विंटल दराने कांदा खरेदी करण्याचा निर्णय सरकारने घेतला.''
'गरज पडल्यास केंद्राकडून आणखी सहकार्य मिळेल'
गरज भासल्यास राज्याला पुन्हा मदत करण्यासाठी केंद्र सरकार तयार आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मी देखील अमित शाह आणि पियुष गोयल यांच्याशी चर्चा केली. गरज पडल्यास केंद्राकडून आणखी सहकार्य मिळेल, अशी खात्री केंद्र सरकारनं दिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आमची केंद्रीय मंत्र्यांसोबत चर्चा झाली. कांदा प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळ त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
'सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं'
यावेळी मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, शेतकरी अडचणीत येतो, तेव्हा सरकार त्यांच्या पाठीशी उभं राहतं. हे आतापर्यंत आपण पाहिलं आहे. जेव्ही अतिवृष्टी, अवकाळी आणि गारपीट झाली, तेव्हा सरकारने सर्व नियम बाजूला ठेवले आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे सरकार उभं राहिलं. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं नाही. आता या मोठ्या संकटामध्ये देखील दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
कांद्याची साठवणूक क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न
कांद्याची साठवणूक क्षमता कशी वाढवता येईल, या दृष्टीने चर्चा झाली. काही निर्णय घेतले, त्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. कांदा चाळी वाढवणं, त्यांचा अनुदान वाढवणं, तसेच मोठ्या प्रमाणावर कोल्ड स्टोरेजची निर्मिती करणे आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरून नाशवंत वस्तू जास्तीत जास्त टिकवण्यासाठी शासन स्तरावर निर्णय घेतले जात आहेत. 'कांद्याची महाबँक' ही संकल्पना राबवत आहोत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
कांदाप्रश्नी मुख्यमंत्र्यांचं शरद पवारांना सडेतोड उत्तर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की, पहिल्यांदा केंद्र सरकारने हस्तक्षेप करुन शेतकऱ्यांना नुकसान होऊ नये, यासाठी 2410 रुपये प्रति क्विंटल हा भाव दिला. हा ऐतिहासिक निर्णय आहे. केंद्राने निर्णय घेतलाय, सहकार्य केलंय. राज्य सरकार देखील यामध्ये कुठे मागे राहणार नाही. यामध्ये राजकारण न करता, शेतकऱ्यांच्या मागे उभं राहायला हवं. शरद पवारांच्या काळातही अशी परिस्थिती निर्माण झाली होती, तेव्हाही असा निर्णय सरकारने घेतला नव्हता. पण, आता मोदी सरकारने मदत केली. त्यामुळे यामध्ये राजकारण करु नये. केंद्र सरकारकारच्या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांना सडेतोड उत्तर दिलं आहे.
केंद्र सरकार दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार
केंद्र सरकारने दोन लाख मेट्रिक टन कांदा (onion) खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील. तसेच 2 हजार 410 प्रतिक्विंटल या दराने कांद्याची खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी दिली. यातून मोठा दिलासा आपल्या राज्यातील कांदा उत्पादकांना मिळेल असेही फडणवीस म्हणाले.