सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाकिस्तानबाबत केलेल्या वक्तव्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केला आहे. "पवार साहेब मोठे नेते आहेत, त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की त्यांच्या वक्तव्याचा फायदा आपल्या देशाला होतो की पाकिस्तानला होतो. मतांसाठी असं वक्तव्य करणं ही गोष्ट योग्य नाही," असं मुख्यमंत्री म्हणाले. साताऱ्यातील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते.

पवार काय म्हणाले होते?
पाकिस्तान आणि भारतात वेगळीच फूट पाडण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं वक्तव्य शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक मेळाव्यात केलं होतं. "पाकिस्तान आणि भारतात वेगळी फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. पाकिस्तान म्हणजे मुस्लीम आणि मुस्लीम म्हणजे पाकिस्तान असं वातावरण बनवलं जात आहे. पाकिस्तानमध्ये एवढी वाईट परिस्थिती नाही. काही लोक स्वतःचा फायद्यासाठी वातावरण दूषित करत आहेत. देशात एक वेगळं वातावरण पसरवलं जातं आहे. बीसीसीआयचा अध्यक्ष असताना मी पाकिस्तानमध्ये गेलो आहे. तेव्हा एक वेगळं वातावरण पाहिलंय. एक वेगळी स्थिती आज देशासमोर आली आहे".

पाकिस्तान आणि भारतात वेगळी फूट पाडण्याचा सरकारचा प्रयत्न : शरद पवार

मतांसाठी अशी विधानं करणं योग्य नाही : मुख्यमंत्री
याबाबत विचारलं असता मुख्यमंत्र्यांनी पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ते म्हणाले की, "पवार साहेब मोठे नेते आहेत. त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की त्यांच्या वक्तव्याचा फायदा आपल्या देशाला होतो की पाकिस्तानला होतो. राहुल गांधी जम्मू काश्मीरला गेले आणि काही अशाप्रकारची वक्तव्यं केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रात म्हटलं की, बघा राहुल गांधीही असंच बोलत आहेत. निवडणुका येतील जातील पण मतांसाठी अशाप्रकारची वक्तव्ये करणं योग्य नाही. पवारांना कदाचित माहित नसेल की, भारतातील मुसलमानाला देशाचा नितांत अभिमान आहे. त्यांच्यासमोर पाकिस्तानची स्तुती केली ते मतं देतील, हा विचारच अन्यायकारक आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसची मानसिकता दिसून येते."