सांगली : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सांगली जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि विधानपरिषदेचे माजी सभापती, दिवंगत ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांचे पुत्र सत्यजित देशमुख यांंनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. देशमुख उद्या महाजनादेश यात्रेदरम्यान भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगलीतील काँग्रेस पक्षाला हा मोठा धक्का समजला जात आहे. सत्यजित देशमुख यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा देणार असल्याचीही घोषणा केली आहे.


दरम्यान, काँग्रेसला सोडचिठ्ठी देताना सत्यजीत देशमुख यांनी राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. "स्वार्थावर उभा राहिलेल्या राष्ट्रवादीची शकलं उडायली लागली आहेत. शरद पवारांनी शिवाजीराव देशमुख साहेबांवर अन्याय केला. सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी पवारांनी नेहमी प्रयत्न केले," अशा शब्दात राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यावर आगपाखड केली.

सत्यजित देशमुख यांचे वडील शिवाजीराव देशमुख यांच्या निधनानंतर विधानपरिषदेची जागा रिक्त झाली होती. तेव्हापासून सत्यजित यांनी भाजपामध्ये घेण्याचे प्रयत्न सुरु होते. आघाडीत शिराळा काँग्रेसला मिळण्याची शक्यता धूसर असल्याने सत्यजित देशमुख दुसऱ्या पर्यायाच्या शोधात होते. सत्यजित देशमुख यांनी आगामी वाटचालीबाबत निर्णय घेण्यासाठी शिराळा इथे कार्यकर्त्यांचा विशेष जनसंवाद मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याच्या माध्यमातून सत्यजित देशमुख यांनी हा आपला निर्णय जाहीर केला. भाजपची महाजनादेश यात्रा उद्या सांगली जिल्ह्यात येत असून यावेळी देशमुख मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

काँग्रेसशी आतापर्यत एकनिष्ठ राहिलेल्या देशमुख घराण्याने भाजपात जाण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे सांगलीत मोठा राजकीय भूकंप झाला असून यातून, काँग्रेसमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे.