Hingoli News : लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर आता विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) (Maharashtra Assembly Election 2024) रणधुमाळी सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने जवळ जवळ सर्वच राजकीय पक्षांनी आपली कंबर कसली असून अनेक दिग्गज नेते आता प्रत्यक्ष मैदानात उतरून मोर्चे बांधणी करताना दिसत आहे. अशातच राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षात उभी फुट पडल्यानंतर आगामी निवडणुकीत या पक्षाचा नव्याने कस लगाणार आहे. परिणामी प्रत्येक पक्षाने आता मतदारसंघनिहाय तयारी सुरू केली आहे.


अशातच  शरद पवारांच्या राष्ट्रवादी (Sharad Pawar) पक्षाचे प्रदेश उपाध्यक्षांनी मोठा दावा केला आहे. यात ते म्हणाले आहेत की, अजित दादाकडे गेलेल्यांची इच्छा असली तरी ते परत येऊ शकणार नाहीत. कारण अजित दादा हे दादाच आहेत. आम्ही गेले अनेक वर्ष सोबत काम केले आहे. त्यामुळे जातो म्हटलं तरी दादा कुणाला जाण्याची परवानगी देणार नसल्याचे ते म्हणाले आहेत. दरम्यान, हिंगोलीच्या वसमत विधानसभेचे आमदार राजेश नवघरे हे परत  शरद पवार यांच्या पक्षात घरवापसी करणार असल्याच्या चर्चा आहे. यावर भाष्य करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर (Jayprakash Dandegaonkar) यांनी हे वक्तव्य केले असून या बाबत मला कुठलाही निरोप नसल्याचे ही त्यांनी सांगितलय.


बसमतसह हिंगोली किंवा कळमनुरी जागेवर राष्ट्रवादीचा दावा  


पुढे बोलताना जयप्रकाश दांडेगावकर यांनी आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने वसमतसह हिंगोली किंवा कळमनुरीच्या जागेवरही दावा केला आहे. कार्यकर्त्यांचा मनोगत जाणून घेतलं तर वसमत हा  हक्काचा मतदारसंघ आहेच. परंतु हिंगोली मध्ये सुद्धा राष्ट्रवादीची मोठी शक्ती आहे. त्यामुळे हिंगोली किंवा पूर्वी लढवलेला कळमनुरी या दोन्हीपैकी एक मतदारसंघ सुद्धा राष्ट्रवादीने लढवावा, अशी मागणी मी पक्षश्रेष्ठींकडे मांडणार असल्याचे ही जयप्रकाश दांडेगावकर म्हणाले. महाविकास आघाडीमध्ये 80 ते 95 इतक्या जागा प्रत्येक पक्षाला राहतील. त्यानुसार मित्रपक्ष ज्या त्या पक्षाने सांभाळायचे आहेत. राष्ट्रवादीच्या 54 जागा होत्या, त्यात 40 लोक पक्ष सोडून गेलेत. तर बाकीच्या जागा राष्ट्रवादीच्या होत्या त्यावरती आता दोन्ही गट दावा करणार, त्यामुळे लढती हा राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादीच असणार आहेत आणि शिवसेनेची पण तीच परिस्थिती राहणार असल्याचेही दांडेगावकर म्हणाले.


मराठवाड्यासाठी शरद पवारांचा काय निरोप?


मराठवाड्यातील चार जिल्ह्याची सर्व माहिती ठेवण्यासाठी मला सांगितला आहे. इतर जिल्ह्यातील राजेश टोपे बघतील आणि पुढच्या आठवड्यात आमची बैठक होणार आहे. त्यामध्ये या सर्व चर्चा होतील. मतदारसंघनिहाय राष्ट्रवादी पक्षाची शक्ती बघणार आहोत. राष्ट्रवादी या निवडणुकीत प्रॅक्टिकल राहणार आहे. तीनही पक्षातले ज्यांची निवडून येण्याची क्षमता आहे,  त्यांच्याच नावाची शिफारस केली जाणार असल्याचे जयप्रकाश दांडेगावकर म्हणाले.


वसमत विधानसभेचा आमदार पवार साहेबांचाच असणार!


सैनिकाला युद्धाची तयारी आहे का? असं नसतं. उद्या पक्षाने सांगितलं की लढावं, तर  तो आदेश सर्व कार्यकर्त्यांना ऐकावंच लागतो आणि मैदानात उतरावे लागतं. वसमत विधानसभेत दांडेगावकर विरुद्ध नवघरे गुरु विरुद्ध शिष्य अशी लढाई राहणार? असा प्रश्न केल्यावर दांडेगावकर म्हणाले की,  हा थोडा अडचणीचा प्रश्न आहे. परंतु बहुतेक असं होणार नाही. आज सगळं काही सांगणार नाही. परंतु तुम्ही म्हणताय तसं काही होणार नसल्याचे भाष्य त्यांनी केलंय. वसमत विधानसभेचा आमदार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांचा असणार आहे, असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलाय.


इतर महत्वाच्या बातम्या