मुंबई : राज्यात 2019 साली झालेल्या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष असूनही त्याला सत्तेपासून वंचित रहावं लागलं. 'अनहोनी को होनी कर दें' अशी ख्याती असलेल्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी कुणाच्याही ध्यानीमनी नसताना शिवसेना-राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसला एकत्रित आणत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केलं. पण ज्यावेळी हे सरकार स्थापन झालं नव्हतं त्यावेळी आपली आणि पंतप्रधान मोदींची सत्ता स्थापनेच्या विषयावर चर्चा झाल्याची माहिती शरद पवारांनी दिली. राज्यात भाजपने आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन सत्ता स्थापन करावी अशी पंतप्रधान मोदींची इच्छा होती, पण आपण त्याला नकार दिल्याची माहिती शरद पवारांनी दिली. शरद पवारांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त ‘लोकसत्ता’तर्फे ‘अष्टावधानी ’ या विशेष पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली.
मोदी-पवारांच्या त्या भेटीत नेमकं काय झालं हे सांगताना शरद पवार म्हणाले की, "निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये अंतर वाढलं होतं. त्यामुळे महाराष्ट्रात स्थिर सरकार आणण्यासाठी भाजपला राष्ट्रवादीची गरज वाटली असेल. यावेळी दिल्ली भेटीत आपली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची राज्यातील परिस्थितीवर चर्चा झाली. त्यावेळी भाजप आणि राष्ट्रवादीने एकत्र यावं अशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इच्छा व्यक्त केली होती. पण मी त्यांना सांगितलं की हे शक्य होणार नाही. आम्हाला तुम्हाला अंधारात ठेवायचं नाही. आपली भूमिका वेगळी आहे. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्याला अजून विचार करण्याचा सल्ला दिला."
महाराष्ट्रात ज्यावेळी भाजप आणि शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच सुरु होती त्यावेळी तब्बल दीड महिना कोणतेही सरकार स्थापन होऊ शकलं नव्हतं. शिवसेना ही अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपदासाठी अडून होती तर भाजपला ते द्यायचं नव्हतं. मग अशा वेळी भाजपने राष्ट्रवादी पक्षाकडेही सत्तेसाठी चाचपणी केली. त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची दिल्लीत भेट झाली होती.
राज्यात विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर सेना-भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन अंतर वाढलं. मग महाविकास आघाडीची चर्चा सुरु असताना अचानक भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शपथविधी उरकला आणि सर्वांना धक्काच दिला. यामुळे राज्यात एक राजकीय भूकंप झाला. यामागे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार असल्याचंही अनेकांनी मत व्यक्त केलं होतं. पण नंतर हे सरकार बहुमत सिद्ध करु शकलं नाही आणि नंतर महाविकास आघाडीची सत्ता आली.
महत्त्वाच्या बातम्या :
- मुली लष्करात याव्यात यासाठी मी प्रयत्न केले, साताऱ्यात शरद पवार यांचे वक्तव्य
- देशासमोर आज अनेक प्रश्न, यावर आपल्यालाच उपाय शोधायचा आहे ; शरद पवार यांचे आवाहन