Sharad Pawar Resigns : शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेबाबत पुढे काय करायचं याबाबत मी एक समिती स्थापन करणार असून यात सदस्य निर्णय घेतील, असं शरद पवार यांनी सांगितलं. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, नरहरी झिरवाळ यांच्यासह प्रमुख नेत्यांनी निर्णय घ्यावा, असं शरद पवार म्हणाले. शरद पवारांचं  (Sharad Pawar Autobiography) आत्मचरित्र 'लोक माझे सांगाती' (Lok Maze Sangati) च्या सुधारित आवृत्तीचे आज प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते. परंतु ते निवृत्त कधी होणार याबाबत त्यांनी सांगितलं नाही. 


माणसाला अधिक मोह असू नये, कुठेतरी थांबायचा विचार केला पाहिजे : शरद पवार


"24 वर्षे मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम करतोय. कुठेतरी थांबायचा विचार सुद्धा केला पाहिजे. माणसाला अधिक मोह असू नये. तुम्हाला अस्वस्थता कदाचित वाटेल. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त व्हायचा निर्णय मी आज घेतला आहे," असं शरद पवार यांनी म्हणाले. तसंच "मी कुठेही असलो तरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी उपलब्ध राहिन हे आश्वस्त करतो. जनतेचे प्रेम आणि विश्वास हाच माझा श्वास आहे," असं शरद पवार निवृत्तीची घोषणा करताना म्हणाले. 


VIDEO : Sharad Pawar NCP : मी राष्ट्रवादीपक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय घेतलाय



पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयाला कार्यकर्त्यांचा विरोध, सभागृहात घोषणाबाजी


दरम्यान, शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर वाय बी सेंटरमध्ये उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यासाठी करण्यात आली. शरद पवार यांनी निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, शरद पवार, शरद पवार अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. यावेळी कार्यक्रत्यांना अश्रू देखील अनावर झाले. इतकंच नाही तर धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्या पाया पडून निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली.


पवारांच्या घोषणेनंतर महाविकास आघाडीत अस्वस्थता


पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेने ठाकरे गट आणि काँग्रेसची चिंता वाढली आहे. महाविकास आघाडीतले कल्पतरु म्हणून शरद पवारांकडे पाहिलं जातं. शरद पवारांच्या आदेशाने महाविकास आघाडीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. पवारांच्या घोषणेनंतर महाविकास आघाडीत अस्वस्थता निर्माण झाली आहे. तसंच काही महत्त्वाचे नेते वाय बी चव्हाणला जाण्याची शक्यता आहे.