मुंबई : राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन शरद पवार निवृत्त झाल्यानंतर आता त्याचा परिणाम राज्यातील महाविकास आघाडीवरही होत असल्याचं दिसून येतंय. महाविकास आघाडीची वज्रमूठ सैल झाली असून पुण्यासह कोल्हापूर, नाशिक आणि अमरावती येथे नियोजित केलल्या वज्रमूठ सभा रद्द झाल्यात जमा असल्याचं बोललं जातंय. पुण्यात 14 मे रोजी, कोल्हापुरात 28 मे रोजी, नाशिकला 3 जूनला तसेच 11 जूनला अमरावतीत नियोजित केलेल्या वज्रमूठ सभा रद्द झाल्याचं विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला सांगितलंय. दरम्यान, शरद पवारांनी राष्ट्रवादीचं अध्यक्षपद सोडल्याच्या पार्श्वभूमीवर मविआच्या सभा रद्द होणं, यावरून चर्चांना उधाण आलंय.


राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदावरून शरद पवार यांनी निवृत्ती जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा नेमकं कोण सांभाळणार याबद्दल अद्याप प्रश्नचिन्ह आहे. पण या सगळ्या राजकीय घडामोडीचा फटका महाविकास आघाडीला पुढील काही दिवसात बसताना दिसणार अशी सध्याची राजकीय परिस्थिती दिसत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना एकत्र करण्यासाठी जी वज्रमूठ आवळली आहे हीच वज्रमूठ या घडामोडीमध्ये सैल तर होणार नाही ना असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण याच वज्रमूठ सभेचं पुढचं नियोजन अंधारात दिसतंय.


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अध्यक्षपदावरुन शरद पवार यांनी निवृत्ती जाहीर केली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा धक्का बसला. या धक्क्याचा परिणाम फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पुरताच सध्या तरी दिसत असला तर येणाऱ्या काही दिवसात याच धक्क्याचा परिणाम महाविकास आघाडीला सुद्धा जाणवणार असल्याचा चित्र दिसतंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा कोण सांभाळणार? शरद पवारांसारख्या अनुभवी नेतृत्वानंतर राष्ट्रवादीचे येणारे नेतृत्व मविआमध्ये पक्षाची भूमिका कशा पद्धतीने मांडणार? महाविकास आघाडीची वज्रमूठ आणखी घट्ट होणार की या सगळ्या घडामोडीमध्ये सैल होणार? असे अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.


दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्षपद हे त्यांचा पक्षांतर्गत निर्णय आहे, महाविकास आघाडीवर त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. 


राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्या घडामोडी सुरू आहेत याचा कुठलाही परिणाम होणार नाही असे जरी महाविकास आघाडीचे नेते म्हणत असले तरी पुढील अंतर्गत कलह आणि मोठ्या नेत्यांची एकमेकांबद्दलची वक्तव्यं पाहता संविधान बचावासाठी आणि महाविकास आघाडीच्या मजबुतीसाठी घट्ट बांधली गेलेली वज्रमूठ सैल होताना दिसत आहे. 


संभाजीनगर नागपूर आणि मुंबई त्या तीन ठिकाणी झालेल्या वज्रमूठ सभेत मोठी ताकद तिन्ही पक्षाने दाखवली असली तरी पुढील होणाऱ्या नाशिक, पुणे, अमरावती, कोल्हापूर या ठिकाणच्या चार वज्रमूठ सभांच नेमकं काय होणार? कोणी म्हणतंय पुण्यातील पुढील सभा पावसामुळे रद्द करण्याचा विचार केला जातोय, तर कोणी म्हणतंय उन्हामुळे पुढील पुण्याची सभा पुढे ढकलण्याचा विचार होतोय.


पुढील वज्रमूठ सभांचे नेमकं नियोजन काय होतं?


14 मे - पुणे - अजित पवार जबाबदारी आणि इतर नेते सोबत तयारी करतील.


28 मे - कोल्हापूर - सतेज पाटील जबाबदारी आणि इतर नेते सोबत तयारी करतील.


3 जून - नाशिक - छगन भुजबळ जबाबदारी आणि इतर नेते सोबत तयारी करतील.


11 जून - अमरावती - यशोमती ठाकूर जबाबदारी आणि इतर नेते साथ देतील.


एनसीपीच्या सर्व घडामोडींकडे ठाकरे गट वेट अँड वॅाचच्या भूमिकेत आहे. लोकसभा निवडणुकींच्या 10 महिन्याअधी पवारांनी घेतलेल्या या निर्णयामुळे ठाकरे गट आणि काँग्रेसही अस्वस्थ असल्याचं बोललं जातंय. भाजपची केंद्रातील उचलबांगडी करायची असेल तर विरोधकांनी एकत्रित भाजपच्या आव्हानाचा सामना करावा लागेल असं वारंवार मविआकडून बोललं गेलं. पण आता पवारच निवृत होत असल्याने विरोधकांची एकी 2024 मध्ये दिसेल का यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. 


महाविकास आघाडीचा आधारस्तंभ म्हणून शरद पवारांकडे पाहिले जातं आणि तेच अध्यक्षपदावरून निवृत्त होताय. मात्र निवृत्त होत असताना आपल्या पुस्तक प्रकाशनाच्या दरम्यान पुस्तकातून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदावर असताना त्यांच्या मंत्रालयातील उपस्थितीबाबत नाराजी व्यक्त केली. तर महाविकास आघाडी निर्माण होत असताना काँग्रेसच्या भूमिकेबद्दलसुद्धा भाष्य केलं. पुस्तकातील हे मजकूर महाविकास आघाडीत भविष्यात नाराजी निर्माण करणारे ठरू शकतात.


त्यामुळे सध्याच्या घडामोडी या फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुरत्याच मर्यादित नाहीत, तर त्याचा मोठा परिणाम येत्या काळात महाविकास आघाडीवर होणार आहे. या परिणामांची सुरुवात शरद पवारांच्या निवृत्ती घोषणेनंतर 24 तासाच्या आत पाहायला मिळत आहे. काँग्रेस आणि ठाकरे गट या सगळ्या घडामोडींवर सध्यातरी वेट अँड वॉचच्या भूमिकेत असले तरी यामुळे घट्ट आवळलेली तीन पक्षांची ही वज्रमूठ सैल होऊ नये, हाच प्रयत्न आता या तीन पक्षांना करायचा आहे.