मुंबई : शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार आणि महाविकासआघाडीचं सरकार स्थापन होणार असं समजत असतानाच, आज सकाळी  देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अशातच अजित पवारांनी घेतलेल्या निर्णयाला शरद पवारांचा पाठिंबा आहे का?, याबाबत चर्चा सुरु होत्या. शरद पवारांच्या एका ट्वीटनंतर या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. शरद पवारांनी ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की, ''अजित पवार यांच्या राजकीय निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाही. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे.''


आज (23 नोव्हेंबर) सकाळी आठच्या सुमारात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. देवेंद्र फडणवीस यांनी आज दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस, भाजपचे काही नेते तसंच अजित पवार राजभवनावर पोहोचले. यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.


"विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कोणत्याही पक्षाला सरकार स्थापन करता आलं नव्हतं. शेतकऱ्यांसह राज्य अनेक अडचणींचा सामना करत होतं. त्यामुळे स्थिर सरकार बनवण्यासाठी हा निर्णय घेतला," अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी शपथविधीनंतर राजभवनात दिली.



अजित पवारांनी हा निर्णय घेतल्याबद्दल आभारी : देवेंद्र फडणवीस
"मला पुन्हा राज्याची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा आभारी आहे. युतीला चांगला जनादेश मिळाला होता. पण शिवसेनेने आमची साथ सोडून दुसऱ्या पक्षासोबत गेली. त्यामुळेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. अशा परिस्थितीत सरकार बनू शकतं नव्हतं. स्थिर सरकार देण्यासाठी अजित पवारांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला. अजित पवारांनी हा निर्णय घेतल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. राज्याला आम्ही स्थिर सरकार देऊ. राज्यातील आव्हानांना आम्ही चांगल सामोरं जावू," अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.



काँग्रेसची टीका
दरम्यान, अजित पवार यांच्या या निर्णयाने काँग्रेस नेत्यांना धक्का बसला आहे. त्यांना या सगळ्याची कल्पना नव्हती. काँग्रेसचे नेते सत्यजीत तांबे यांनी यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. राष्ट्रवादीची रात्री बैठक झाली. पण त्याला अजित पवार नव्हते. लाज वाटावी असं राजकारणं त्यांनी केलं, असं ते म्हणाले.