राज्यात एकीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकासआघाडीचं सरकार स्थापन होणार असं वाटत असतानातच, भाजपने राजकारणात मोठा भूकंप घडवला. विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. परंतु शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी अडून बसली आणि काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत घरोबा मांडण्यास तयार झाली. मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावावर तिन्ही पक्षांच्या संयुक्त बैठकीत सहमती देखील झाली. परंतु आज सकाळी राजभवनात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत सगळ्यांनाच धक्का दिला.
स्थिर सरकारसाठी निर्णय घेतला : अजित पवार
"विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कोणत्याही पक्षाला सरकार स्थापन करता आलं नव्हतं. शेतकऱ्यांसह राज्य अनेक अडचणींचा सामना करत होतं. त्यामुळे स्थिर सरकार बनवण्यासाठी हा निर्णय घेतला," अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी शपथविधीनंतर राजभवनात दिली.
अजित पवारांनी हा निर्णय घेतल्याबद्दल आभारी : देवेंद्र फडणवीस
"मला पुन्हा राज्याची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा आभारी आहे. युतीला चांगला जनादेश मिळाला होता. पण शिवसेनेने आमची साथ सोडून दुसऱ्या पक्षासोबत गेली. त्यामुळेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. अशा परिस्थितीत सरकार बनू शकतं नव्हतं. स्थिर सरकार देण्यासाठी अजित पवारांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला. अजित पवारांनी हा निर्णय घेतल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. राज्याला आम्ही स्थिर सरकार देऊ. राज्यातील आव्हानांना आम्ही चांगल सामोरं जावू," अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
काँग्रेसची टीका
दरम्यान, अजित पवार यांच्या या निर्णयाने काँग्रेस नेत्यांना धक्का बसला आहे. त्यांना या सगळ्याची कल्पना नव्हती. काँग्रेसचे नेते सत्यजीत तांबे यांनी यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. राष्ट्रवादीची रात्री बैठक झाली. पण त्याला अजित पवार नव्हते. लाज वाटावी असं राजकारणं त्यांनी केलं, असं ते म्हणाले.
राष्ट्रवादीत फूट पाडून अजित पवार सत्तेत?
शपथविधीच्या वेळी केवळ अजित पवार यांच्यासह त्यांचं कुटुंब राजभवनात उपस्थित होतं. परंतु पक्षाचे कोणतेही नेते हजर नव्हते. त्यामुळे बंड करु अजित पवार सत्तेत सहभागी झाले आहेत की राष्ट्रवादीचा थेट पाठिंबा भाजपला आहे की राष्ट्रवादीत फूट पाडून अजित पवार सत्तेत सामील झाले आहेत का? अशीही चर्चा रंगली आहे.
शपथविधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करुन देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं अभिनंदन केलं. महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्यासाठी दोन्ही नेते उत्तम काम करतील याची खात्री आहे, असं पंतप्रधानांनी दिली आहे.