बारामती : ज्यांचा संबंध नाही त्यांच्यावर खटले दाखल करायची. कुठल्यातरी लोकांच्या आदेशाचा वापर करून खटले दाखल केले जात आहेत. त्यांना सांगून ठेवतो या सर्व खटल्यांना हा बारामतीकर पुरुन उरल्याशिवाय राहणार नाही. काय करायचं ते करा असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिला. आज शरद पवार यांच्या प्रचाराची शेवटची सभा बारामतीत पार पडली. यावेळी ते बोलत होते.


21 जिल्ह्यात जावून आलो. त्यावेळी तरुण पिढी माझ्यासमोर होती. पाच वर्ष भाजपचं राज्य पाहिलं. समाजातील एकही घटक समाधानी नाही. शेती कारखानदारी, कामगार अल्पसंख्यांक, कुणाच्याही हिताची जपणूक झालेली नाही असा आरोप शरद पवार यांनी केला.

'अरे तो माझाही बाप आहे, हे विसरु नका', सुप्रिया सुळेंचं उत्तर आणि एकच हशा

या सरकारला पाच वर्षांत काय केलं हे विचारा. आजपर्यंत 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या सरकारला लाज कशी वाटत नाही असा सवालही शरद पवार यांनी केला. 70 हजार कोटीचे कर्ज आम्ही माफ केले. व्याज कमी केलं यांनी काय केलं. बारामतीत कारखाने आणून तरुण मुलांच्या हाताला काम मिळवून देण्याचे काम केले आहे असेही शरद पवार यांनी सांगितले.

कारखाने बंद पडत आहेत याची जबाबदारी कुणाची आहे. तर ती सरकारची आहे, मात्र ही जबाबदारी सरकार घेत नसल्याने देशात आणि राज्यात बेरोजगारी वाढत आहे असेही शरद पवार म्हणाले. सत्तेचा गैरवापर करतोय त्यांना धडा शिकवायचा आहे. त्यांना त्यांची जागा दाखवायची आहे. त्यासाठी आपल्या माणसाच्या घड्याळावर व आघाडीच्या उमेदवाराचे बटण दाबून बदल घडवूया असे आवाहन शरद पवार यांनी केले.

महाराष्ट्रातील निवडणूक तरुणांनी ताब्यात घेतली आहे हे चित्र आहे.तरुणांचा दर्या आमच्या बाजूने आहे आणि संपत्तीचा डोंगर भाजपकडे आहे हा डोंगर उद्ध्वस्त करण्याची ताकद  तरुणांमध्ये आहे तो गप्प बसणार नाही असेही शरद पवार म्हणाले.