मुंबई : आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर कालपासून नॉट रिचेबल असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज सकाळी फोन सुरु झाला. त्यानंतर दुपारी 12.45 च्या सुमारास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे मुंबई येथील निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक बंगल्यावर शरद पवार, अजित पवार आणि इतर कुटुंबियांमध्ये कौटुंबिक चर्चा झाली. या चर्चेनंतर शरद पवार माध्यमांसमोर आले. यावेळी शरद पवारांनी चिंतेचे काहीही कारण नाही, असे सांगितले. त्यानंतर दुपारी 3.30 वाजता अजित पवार यांनी नरीमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पत्रकार परिषद घेतली.


पत्रकार परिषदेत अजित पवार म्हणाले की, शरद पवारांचं नाव शिखर बँक घोटाळा प्रकरणात आल्यानं अस्वस्थ होऊन मी राजीनामा दिला. ज्या पक्षानं मला मान-सन्मान व पदं दिली त्या पक्षाविरोधात काही करण्याचा विचारही करू शकत नाही, अशा शब्दात अजित पवारांनी आपल्या राजीनाम्याबाबत स्पष्टीकरण दिलं. तसेच राष्ट्रवादीला सोडण्याच्या किंवा अन्य शक्यतांनाही त्यांनी फेटाळून लावलं. काल झालेल्या राजीनाम्यानंतर आज अत्यंत हायव्होल्टेज पत्रकार परिषदेत त्यांनी हे खुलासे केले. यावेळी पहिल्यांदाच भावनेचा बांध फुटून अश्रू अनावर झालेले अजित पवारही पाहायला मिळाले.

अजित पवारांच्या राजीनामानाट्याचा संपूर्ण घटनाक्रम

काल (27 सप्टेंबर)

काल (27 सप्टेंबर) संध्या 5.40 वा : अजित पवारांनी राजीनामा दिला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेंनी राजीनामा स्वीकारला. दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्व नेते अनभिज्ञ.

काल संध्या 7 वा : शरद पवार पुण्यात पोहोचले आणि त्यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली.

काल रात्री 8.30 वा : शरद पवारांची पुण्यात पत्रकार परिषद. अजित पवारांच्या राजीनाम्याबद्दल कल्पना नसल्याचे सांगितले.

काल रात्री 9 वा : अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार प्रेमकोर्टमधील घरून निघून सिल्व्हर ओकवर (शरद पवारांचे मुंबईतील निवासस्थान) पोहोचले.

काल रात्री 10.30 वा : राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, धनंजय मुंडे शरद पवारांच्या सिल्व्हर ओक या घरी पोहोचले आणि तिथे बैठक सुरू झाली.

काल रात्री 12 वा : सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी पार्थ पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.

आज (28 सप्टेंबर) 

आज (28 सप्टेंबर) सकाळी 9 वा : शरद पवार पुण्यातून मुंबईकडे येण्यासाठी निघाले.

आज दुपारी 12 वा : शरद पवार त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी पोहोचले.

आज दुपारी 12.40 वा : शरद पवारांचे ज्येष्ठ बंधू श्रीनिवास पवार सिल्व्हर ओकवर पोचले.

आज दुपारी 01.00 वा : अजित पवार सिल्व्हर ओकवर पोहोचले. त्यांच्यासोबत धनंजय मुंडेही पोहोचले.

आज दुपारी 01.05 वा : सिल्वर ओक बंगल्यावर पवार कुटुंबियांची बैठक सुरु. यामध्ये शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, श्रीनिवास पवार एवढेच लोक उपस्थित.

आज दुपारी 2.15 वा : पवार कुटुंबियांची बैठक संपली. अजित पवार बाहेर पडले आणि पाठोपाठ शरद पवार बाहेर पडले. अजित पवार नरीमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथील सभागृहात पत्रकार परिषद घेतील, असे सांगण्यात आले.

आज दुपारी 2.30 वा : धनंजय मुंडेच्या घरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक सुरु

आज दुपारी 3.00 वा : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथील पत्रकार परिषदेची तयारी पूर्ण.

आज दुपारी 3.10 वा : धनंजय मुंडेंच्या घरातली बैठक संपवून राष्ट्रवादीचे नेते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानकडे रवाना.

आज दुपारी 3.20 वा : शिवसेना खासदार संजय राऊत शरद पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी दाखल.

आज दुपारी 3.30 वा – अजित पवार धनंजय मुंडेसह यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पत्रकार परिषदेकरता पोहोचले.

आज दुपारी 3.45 वा : अजित पवारांची पत्रकार परिषद सुरू झाली.

कुटुंबियांसोबतच्या बैठकीनंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया



वाचा : ज्या पक्षानं मान दिला त्याविरोधात काही करणार नाही; भावूक अजित पवारांचं स्पष्टीकरण