मुंबई : आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर कालपासून नॉट रिचेबल असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज सकाळी फोन सुरु झाला. त्यानंतर दुपारी 12.45 च्या सुमारास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे मुंबई येथील निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक बंगल्यावर शरद पवार, अजित पवार आणि इतर कुटुंबियांमध्ये कौटुंबिक चर्चा झाली. या चर्चेनंतर शरद पवार माध्यमांसमोर आले. यावेळी शरद पवारांनी चिंतेचे काहीही कारण नाही, असे सांगितले.

शरद पवार म्हणाले की, "अजित पवार हे त्यांच्या सहकाऱ्यांशी बोलून अंतिम निर्णय घेतील. दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद घेऊन अजित पवार त्यांची भूमिका स्पष्ट करतील. त्यामुळे मी यावर काहीही बोलणार नाही. तुम्ही (माध्यमांनी)अजित पवारांच्याच तोंडून ऐका. मी एवढंच सांगतो की, चिंता करण्याची गरज नाही"

अजित पवार यांची पत्रकार परिषद ही विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी होणार होती. परंतु आचारसंहितेमुळे मुंडे यांच्या निवासस्थानी ही पत्रकार परिषद घेता येणार नाही. (मुंडे यांचे निवासस्थान ही शासकीय इमारत आहे. आचारसंहितेच्या काळात या ठिकाणी पत्रकार परिषद घेता येत नाही.) त्यामुळे दुपारी साडेतीन वाजता मुंबईतल्या नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात अजित पवार पत्रकार परिषद घेतील.

शरद पवार आणि अजित पवार यांच्यात चर्चा | ABP Majha



दरम्यान, कालपासून अजित पवार कुठे आहेत? अजित पवार यांनी पक्षाचा राजीनामा का दिला? पवार कुटुंबात काही वाद आहेत का? आणि त्यामुळे अजित पवारांनी राजीनामा दिला का? अजित पवार राजकीय सन्यास घेणार का? असे अनेक प्रश्न अवघ्या महाराष्ट्राला पडले आहेत. याबाबत अजित पवार थोड्याच वेळात भूमिका स्पष्ट करणार आहेत.

अजित पवारांच्या राजीनाम्याचं नेमकं कारण काय?



संबंधित बातम्या