कोल्हापूर : 2005 साली जिथपर्यंत पाणी आलं होतं, ती पातळी आपण ग्राह्य धरली ही चूक झाली असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. कोल्हापूर आणि सांगलीतील पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पवार कोल्हापूरला आले होते. यावेळी ते बोलत होते.
यावेळी पवार म्हणाले की, आता पुरावर कायमचा उपाय केला पाहिजे. पूर ग्रस्तांना नवीन घरे बांधून दिली पाहिजेत, जी टिकाऊ असतील. लातूरला भूकंप झाला त्यावेळी आम्ही एक लाख घरं बांधली होती. आता तसा निर्णय घेतला पाहिजे, असे पवार म्हणाले. काही गावंही हलवावी लागतील, असे ते म्हणाले.
Sharad Pawar | शरद पवारांकडून कोल्हापूरच्या पूरग्रस्त भागाची पाहणी, राष्ट्रवादीची 50 डॉक्टरांची टीम पूरग्रस्त भागात | ABP Majha
ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्या कर्जाला सरकारकडून पूर्ण माफी दिली पाहिजे. उस उत्पादक शेतकऱ्यांनी नवीन बेणे घेऊन उसाची लागवड केली पाहिजे. ज्यांना नवीन लागवड करायची आहे त्यांना नवीन बेणे देण्याची व्यवस्था केली पाहिजे, असे पवार म्हणाले.
तसेच मजुरांसाठी रोजगार हमी किंवा कोणत्याही मार्गाने रोजगार देणे आवश्यक आहे. राष्ट्रवादी पूरग्रस्त भागात डॉक्टर पाठवले आहेत. घरे बांधणीत देखील मदत करणार आहोत, असं त्यांनी सांगितलं.
कोल्हापूरकर कोणत्याही संकटांना घाबरत नाहीत. या आपत्तीमध्ये कोणतंही राजकारण करू नका, असेही पवार म्हणाले.