सातारा : 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकावरुन सुरु झालेल्या वादावर राष्ट्रवादीच्या अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींशी छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केलेली चातल नाही, मग शरद पवारांना 'जाणता राजा' का म्हणतात? असा सवाल उपस्थित केला गेला होता. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, मी कधीही, कुठेही मला जाणता राजा म्हणा, असं म्हटलं नाही. जाणता राजा हा शब्द रामदास स्वामी यांनी आणला होता.


रामदास स्वामी शिवरायांचे गुरु नव्हते


छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास नीट वाचला तर काही गोष्टी स्पष्ट होतील. रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरु होते, हे खोटं आहे. रामदास स्वामी छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते. राजमाता जिजाऊ या शिवरायांच्या खऱ्या गुरु होत्या. रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरु होते, हे आज बोललं जात आहे, ही सगळी लेखणीची कमाल आहे. छत्रपती हीच खरी शिवाजी महाराजांची उपाधी आहे, असं शरद पवारांनी म्हटलं. तसेच साताऱ्यात कुणी काय बोललं त्यावर मला काहीही बोलायचं नाही. त्याविषयी बोलायला आमचे रामराजे नाईक निंबाळकर पुरेसे आहेत, असा टोलाही शरद पवारांनी उदयनराजेंना लगावला.



काय म्हणाले होते उदयनराजे भोसले?


छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाचीही होऊ शकत नाही. महाराजांशी तुलना करणं अत्यंत चुकीचं आहे. एक युगपुरुष जन्माला येतो, ते आमचे छत्रपती शिवाजी महाराज. जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजच आहेत. जेव्हा तुम्ही कोणलाही ही उपमा देत असता तेव्हा विचार करायला हवा. ज्यांना ही उपमा लावली जात आहे, त्याचाही मी निषेध करतो, असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांना अप्रत्यक्ष टोला लगावला


काय आहे वाद?


भाजप नेते जयभगवान गोयल यांनी 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' असं शिर्षक असलेलं पुस्तक लिहलं होतं. या पुस्तकावरील मुखपृष्ठावरील फोटो आणि शिर्षकातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करण्यात आली होती. या पुस्तकाचे अनावरण भाजपच्या कार्यालयात करण्यात आलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याने लेखक आणि भाजप विरोधात देशभरात संतापाची लाट पसरली होती. अखेर विरोधाचा सूर आणि दबाव पाहता लेखक जयभगवान गोयल यांनी आपलं पुस्तक मागे घेतलं. पुस्तकाचा भाजपशी काहीही संबंध नाही. भाजपच्या कार्यक्रमाचाही तो भाग नव्हता. लेखकाने क्षमा मागितली आणि पुस्तकही मागे घेण्यात आलं असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केली होती.