अहमदनगर: मालेगाव बॉम्बस्फोट तपासप्रकरणी एनआयच्या भूमिकेमुळे विश्वासार्हतेला धक्का बसला आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. ते अहमदनगरमध्ये बोलत होते.

 

"एनआयएच्या तपासामुळे विश्वासार्हतेला धक्का बसला. हे योग्य नाही. निरपराधांची हत्या झाली. अल्पसंख्यांक समाजाचा व्यक्ती 'जुम्मा'च्या दिवशी मशिदीत कधी हल्ला करेल, हे शक्य नाही. मी अजूनपर्यंत हे पाहिले नाही, या प्रकरणाचा तपास शहीद हेमंत करकरे यांनी केला, मात्र त्यांचा तपास चुकीचा असल्याचं बोललं जात आहे" असं पवार म्हणाले.

 

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरसह सहा जणांविरोधातील मोक्का हटवला

राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने 2008 च्या मालेगाव स्फोटाप्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरसह सहा जणांविरोधातील मोक्का हटवण्याचा निर्णय घेतला आहे. एनआयएने विशेष कोर्टात दाखल केलेल्या आरोपपत्रात साध्वी प्रज्ञासह सहा जणांना क्लिन चीट मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.

 

2008 ला मालेगावमधल्या शब-ए-बारातच्या रात्री झालेल्या स्फोटात चौघांनी जीव गमावला. 79 जण जायबंदी झाले. देशात पहिल्यांदाच भगवा दहशतवाद हा शब्द रुढ झाला आणि त्याचा चेहरा बनली साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर.

 

2011 साली या बॉम्बस्फोटाचा तपास एटीएसकडून एनआयएकडे वर्ग करण्यात आला. 2014 साली सत्तांतर झालं. त्यानंतर एनआयएने दोन वर्षात नव्याने तपास करत, साध्वीसह सहा जणांविरोधात सबळ पुरावे नसल्याचं म्हटलं आहे.


संबंधित बातम्या


मालेगाव स्फोट : साध्वी प्रज्ञासह सर्व आरोपींवरील मोक्का हटवला