कोल्हापूर: कोल्हापूरच्या इचलकरंजीत दोन आठवड्यापासून सुरू असलेल्या रणरागिणींच्या दारुबंदी आंदोलनाने रौद्र रूप घेतलं.

 

गेल्या दोन आठवड्यांपासून या महिला सरकारमान्य दारु दुकान बंद करण्यासाठी ठाण मांडून आहेत. त्यामुळे इकडे फिरकायची कुणाला हिंमत होत नाही. पण तरीही हे दोन महाभाग यथेच्च ढोसण्यासाठी इथं आलेच. महिलांसोबत या दोघांची बाचाबाची झाली. या दोघांनी महिलांना धक्काबुक्की केली. त्यामुळे या बहाद्दरांना महिलांनी थेट लाटण्यानं चोप दिला.

 

आतापर्यंत भजन करत बसलेल्या महिलांनी थेट रुद्रावतार धारण केला. दरम्यान आज भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई दारू आंदोलना स्थळी भेट देणार आहेत.

 

तृप्ती देसाईंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

 

गृहमंत्रीपद सांभाळणं हा पार्ट टाईम जॉब नाही, त्यामुळे ते खातं सक्षम व्यक्तीकडे द्यावं, असा निशाणा भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी मुख्यमंत्र्यांवर साधला.

 

खाजगी कार्यक्रमाच्या निमित्ताने कोल्हापुरात आलेल्या तृप्ती देसाई यांनी पत्रकार परिषदेत ही प्रतिक्रिया दिली.  त्याआधी अंबाबाई मंदिरात मारहाण करणाऱ्या श्रीपूजक आणि अन्य कार्यकर्त्यांवर आठ दिवसात गुन्हे दाखल करा अन्यथा राजवाडा पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिला.

 

इतकंच नाही, तर राज्यातल्या मंदिरांमध्ये महिला श्रीपूजकांची नियुक्ती करुन त्यांना पूजेचा अधिकार देण्याची मागणीही त्यांनी केली.