नागपूर : नागपुरातील वाढलेले तापमान पाहता दुपारची शाळा ही सकाळीच करावी, असे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत. पण त्याच्या अंमलबजावणीत बरेच अडथळे आहेत. सध्या नागपूर महानगरपालिकेच्या 30 शाळांना हे करणे शक्य नाही. त्यामुळे शिक्षण विभागाच्या निर्देशाला बाजूला ठेवून मुलांना भर दुपारी शाळेतून घरी जावं लागणार आहे.


उन्हाच्या तडाख्यामुळे विदर्भातील राज्य बोर्डाच्या शाळांच्या वेळा बदलण्यात याव्यात, असे निर्देश शिक्षण विभागाने नुकतेच दिले होते. मात्र जागेची कमतरता, आणि इमारतींची दुरावस्था आणि परिक्षांचे वेळापत्रक आदींमुळे नागपुरातील 169 पैकी महानगरपालिकेच्या 30 शाळांना या निर्देशाचे पालन करणे अशक्य झाले आहे.

महापालिकेच्या या 30 शाळांमध्ये जवळपास एक हजार विद्यार्थी शिकतात. पण या शाळांधील जागेची कमतरता, इमारतींची दुरावस्था आदी कारणांमुळे सर्वांचेच वर्ग एकत्र भरवणे अशक्य आहे. त्यातच सर्व विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षांचे वेळापत्रक दिल्यामुळे, त्यात बदल करणे शक्य नसल्याचं शाळा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे शिक्षण विभागाचा निर्णय सद्यपरिस्थितीत सर्व शाळांना लांबणीवर टाकावा लागणार आहे.

दरम्यान, येत्या शैक्षणिक वर्षात विदर्भ वगळता राज्यातील इतर शाळा 15 जूनला सुरु होणार आहेत. तर विदर्भातील शाळा मात्र 27 जूनला सुरु होणार आहेत. यासाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक संचालनालयाने हा निर्णय आधीच जाहीर केला आहे. त्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षात शाळेची पहिली घंटा लवकर वाजणार आहे.

संबंधित बातम्या

उन्हाच्या तडाख्यामुळे विदर्भातील शाळांच्या वेळापत्रकात बदल