कोल्हापूर : एफआरपीच्या मुद्द्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी मिळालीच पाहिजे, या मागणीकडे सरकारने बघ्याची भूमिका घेऊ नये. अन्यथा सरकारला याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.
साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी द्यावी कसा कायदा असताना साखर कारखाने एफआरपीचे तुकडे करत आहेत. काही साखर कारखान्यानीं तर एफआरपीपेक्षा 300 ते 600 रुपये कमी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहे, असा आरोप राजू शेट्टींनी केला.
यामुळेच स्वाभिमानीकडून कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील काही साखर कारखान्याच्या गट ऑफिसवर हल्ला करत तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. या आंदोलनाचा उद्रेक कारखानदारांनी लक्षात घ्यावा आणि एक रकमी एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी. अन्यथा संघर्ष अटळ आहे असं शेट्टी यांनी म्हटलं आहे.
तसेच सरकार बेकायदेशीररित्या वागणाऱ्या साखर कारखान्यांना पाठिशी घालत आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा उद्रेक झाला, असल्याचं राजू शेट्टींनी सांगितलं. सरकारने याकडे बघ्याची भूमिका घेऊ नये, अन्यथा सरकारला सुद्धा याची किंमत चुकती करावी लागेल, असा इशारा राजू शेट्टींनी सरकार आणि कारखानदारांना दिला आहे.