मुंबई : राजकीय घडामोडींवर सातत्याने व्यंगचित्राच्या माध्यमातून भाष्य करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज अजून एक व्यंगचित्र काढले आहे. या व्यंगचित्राद्वारे राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'वर्मा'वर बोट ठेवले आहे. एकाच व्यंगचित्रात दोन राजकीय घडामोडींवर भाष्य करत राज ठाकरेंनी एकाच दगडात दोन पक्षी मारले आहेत, असे बोलले जात आहे.


राज यांनी आलोक वर्मा प्रकरणावरून आणि अघोषित आणीबाणीवरून मोदी सरकारवर टीका केली आहे. हे व्यंगचित्र भाजपाच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना चांगलेच झोंबणार असे दिसत आहे. राज ठाकरे यांनी हे व्यंगचित्र त्यांच्या ऑफिशियल ट्विटर आणि फेसबुक पेजवर अपलोड केले आहे.

निवड समितीने दोन दिवसांपूर्वी सीबीआय संचालक पदावरून आलोक वर्मा यांची हकालपट्टी केली. आलोक वर्मा यांची बदली करण्यात आली. परंतु तो विभाग न स्वीकारता आलोक वर्मा यांनी राजीनामा दिला. या घटनेवरुन राज यांनी व्यंगचित्राद्वारे मोदींवर निशाणा साधला आहे.

व्यंगचित्राच्या दुसऱ्या बाजुला नरेंद्र मोदी खड्डा खणत असल्याचे पहायला मिळत आहे. त्या खड्ड्याला राज यांनी संशय असे नाव दिले आहे. या चित्राला 'हुद्दा गमावला आणि खड्डा कमावला' असा मथळा दिला आहे. खड्ड्याशेजारी आलोक वर्मा प्रकरण मृतदेहाप्रमाणे दाखवले आहे. मोदी हे प्रकरण खड्ड्यात गाडून लपवू पाहत आहेत. असे या व्यंगचित्रात दाखवले आहे. त्याचवेळी सुजान नागरिक मोदींना 'तुम्ही खड्ड्यात कसे काय?' असे विचारत आहेत.

व्यंगचित्राच्या दुसऱ्या भागात नयनतारा सहगल प्रकरणावरून राज यांनी सरकारचा समाचार घेतला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आणीबाणीची आठवण झाल्याचे राज ठाकरे सांगत आहेत. तसेच एक गायिका तंबोरा घेऊन गायन करण्यास बसली आहे. गायिकेसमोरच्या हार्मोनियम वादक विचारतोय की, 'पोलीस विचारतायत की आज तुम्ही कोणता राग गाणार आहेत'.